जुळी मुल होणार याचा आनंद होता. पण तो महिनाभरच टिकला. आपला एक मुलगा अंध आहे हे कळलं. त्यादिवसापासून दोघांच्या संसाराची दिशा बदलली. डोळस शिकेलच पण अंध मुलगाही कर्तृत्ववान झाला पाहिजे यासाठी सुरु झाली धडपड. आज उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून त्याच कौतुक होतं. दहावीच्या परिक्षेत डोळस भावाबरोबर तो उत्तीर्ण होतो. तेव्हा गेल्या 16-17 वर्षात घेतलेले परिश्रम, हातून सुटलेले आनंदाचे अनेक क्षण या सर्वांच चीज झाल्यासारखं वाटतं.
ही कथा आहे गुहागर शहरातील सौ. मिरा आणि मिलिंद गाडगीळ यांची. पत्नी धडपडत असताना तिच्या पाठी मिलिंद खंबीरपणे उभा होता. अंध मयुरेश कर्तृत्ववान व्हावा म्हणून मिरा नियतीशी झगडत होती. मयुरेशला शिकवायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे म्हणून संसार सांभाळताना तिनेही पुन्हा पुस्तकं हाती घेतली. वरळी, मुंबई मधील नॅब संस्थेतून अंध विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी असलेला पॅरा प्रोफेशनल कोर्स केला. ज्यामुळे ब्रेल लिपीचं प्राथमिक ज्ञान, त्यांच्याशी कसं वागायंच, त्यांना कसं शिकवायचं याची माहिती मिळाली. गुहागरसारख्या ठिकाणी अंध मुलांना शिकविण्याची सोय नव्हती. म्हणून सायकॉलॉजी या विषयातून पदवी मिळविलेल्या सौ. मिराने एस.एन.डी.टी. सांताक्रुझमधुन व्हिज्युअल इम्पेअरमेंट हा बि.एड.चा एक वर्षाचा विशेष कोर्स केला. यावेळी गिरगांवमधील नातेवाईक बर्वे कटुंबाची साथ मिराला मिळाली. मयुरेशला उभं करायच या एकमात्र ध्येयासाठी ती झटत होती. यावेळी निराशेचे, चिंतेचे अनेक क्षण आले. अशा क्षणी मिराला पुस्तकांची साथ मिळाली. निला सत्यनारायण, सुधा मुर्ती, हेलन केलर आदींची पुस्तक वाचून मनावरली जळमट ती दूर करीत असे.
लहानग्या मयुरेशला कसा सांभाळायचा, त्याच्यावर कसे संस्कार करायचे यासाठी मिराचे शिक्षण उपयोगी पडले. पण मयुरेश लवकरात लवकर स्वावंलबी होण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक होते. गुहागरात त्याला आवश्यक शिक्षण उपलब्ध नाही. म्हणून घराडी, ता. मंडणगड येथील स्नेहज्योती शाळेत मयुरेशला वयाच्या ६ व्या वर्षी ठेवण्यात आले. त्या दिवसांत मायबापाच्या गळ्याखाली घास उतरत नव्हता. रोज आठवणीने डोळे भरुन यायचे. मयुरेशचीही अवस्था वेगळी नव्हती. आईबाबांना पाहिलं नसलं तरी नेहमीच्या, मायेच्या स्पर्शापासून तो दुरावला होता. त्याचे हे दु:ख हार्मोनियमच्या स्वरात विरुन गेले. शालेय शिक्षण घेता घेता गळ्यातून न उमटणारे सुर बोटातून उमटवायची जादु त्याने आत्मसात केली. अंध विद्यालयातील शिक्षण, नॅबचे प्रशिक्षण या सर्वांमुळे तो डिजिटल साक्षर झाला. त्यांचे गुरु मयुरेशला मोबाईलवरुन हार्मोनियमचे मार्गदर्शन करु लागले. मध्यमापर्यंत हार्मोनियम वादनाचे शिक्षण त्याने पूर्ण केले आहे. साधारणपणे अंध विद्यालयात सातवीपर्यंतचे शिक्षण मिळते. त्यानंतर साधारण शाळेतूनच पुढे जावे लागते. स्वाभाविकपणे मयुरेशने त्याचा भाऊ मकरंदबरोबर शाळेत जावून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज मयुरेश मकरंदबरोबर गुहागरच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. अनेक गाण्याच्या कार्यक्रमांना, किर्तनांना हार्मोनियमची साथ देतो. मोबाईल, कॉम्प्युटर सहज वापरतो. रस्त्यावरुन एकटा फिरतो. डोळस माणसांप्रमाणे व्यवहार करु शकतो.
मिरा मिलिंद मयुरेशसाठी धडपडत असतानाच्या काळात आजी आजोबांनी मकरंदला घडवले. आजी मकरंदसाठी आई बनली होती. मकरंदला आपल्या जुळ्या भावासाठी प्रत्येकवेळी ॲडजेस्टमेंट करावी लागली. मात्र ही भूमिका मकरंद स्विकारत गेला. शाळेत मित्रांसोबत मस्ती करायच्या वयात मयुरेशचा आधार बनला. मयुरेशला त्याचे इतके प्रोत्साहन असते की, आजही पेटी वाजवून मयुरेश आला की त्याच्या दुखणाऱ्या बोटांना मकरंद मसाज करतो. मयुरेशच्या सुखदु:खाशी तो ही समरस झालाय.
हा संपूर्ण कालखंड मिलिंदासाठी देखील झगडण्याचाच होता. कृषी विषयात पद्व्युत्तर शिक्षण घेवून बागायतीमध्ये करियर करण्यासाठी निघालेल्या मिलिंदाला अचानक दिशा बदलावी लागली. संसार थाटल्यानंतर, जुळ्या मुलांचा जन्म झाल्यावर जीवनाची गणितं बदलणं हे सोपं नव्हतं. गाव सोडून अर्थाजनासाठी कुटुंब कबिल्यासह भ्रमंती करणं नशिबी आलं तरी तो हरला नाही. खचला नाही. वडिल म्हणून तो कधी व्यक्त झाला नाही. पण परिस्थितीशी दोन हात करताना मयुरेशसाठी खस्ता खाणाऱ्या पत्नीला प्रोत्साहन त्याने दिलं.
एका अंध मुलाच्या प्रगतीचा हा प्रवास वाचायला सोपा असला तरी प्रत्यक्षात कठीण आहे. आईवडिल, आजी आजोबा, नातेवाईक असे सारेजण जेव्हा दृष्टीहिनाला उभं करण्यासाठी धडपडतात. त्याचवेळी त्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलते. आजही मिरा मिलिंद याचा प्रवास संपला नाहीए. तो सुरु रहाणार आहे मयुरेश आणि मकरंद कर्तृत्वान बनेपर्यंत.
परमेश्र्वर या प्रवासासाठी गाडगीळ कुटुंबाला बळ देवो हीच प्रार्थना.