कोल्हापूर : भाजपच्या पाठिंब्यावरच परमबीर सिंह यांनी 100 कोटींचे बनावट पत्र दिले. एनआयएने खाकी वेशातील दरोडेखोरांना गजाआड करावे, अशी मागणी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महाविकास आघाडी अस्थिर व अडचणीत आणण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्याला देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
परमबीर सिंह हे मुंबईच्या आयुक्तपदावर होते, त्यावेळी त्यांनी आरोप केले नाहीत. मात्र, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावरील आरोप सिद्ध होतात, असे कळले तेव्हा त्यांची बदली करण्यात आली. या आरोपातून वाचण्यासाठी त्यांनी भाजपच्या पाठिंब्यातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले.
शंभर कोटींचे बनावट पत्रक काढून त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केले. त्या पत्रावरून अनिल देशमुखांना वारंवार चौकशीच्या फेऱ्यात अडकवले गेले. पंचवार्षिक योजने प्रमाणे एनआयएची भूमिका आहे. त्यांनी खाकीतील दरोडेखोरांना गजाआड करावे. महाविकास आघाडी अस्थिर व अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. त्याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.
15 व्या वित्त अयोगाबाबत सर्व अडचणी दूरपंधराव्या वित्त आयोगातील पैसे खर्च करण्यास काही अडचणी समोर आल्या होत्या. पीएफएमएस ही अडचण समोर आली होती. त्यावेळी ही अडचण दूर झाल्याशिवाय वित्त आयोगातील पैसे खर्च करता येणार नाहीत, असे आदेश केंद्र सरकारने काढले होते.
राज्य सरकारने ही अडचण दूर करून पंधराव्या वित्त आयोगातील प्रणाली सुस्थितीत केली आहे. याबाबत बैठक घेऊन पैसे खर्च करण्यास परवानगी दिली आहे, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.