पर्यटन मंत्रालय देणार तीन वर्षांचा ठेका, पर्यटकांना होणार लाभ
गुहागर, 14 : समुद्रकिनाऱ्यांवर प्रसाधनगृह, न्हाणीघर, कपडे बदलण्यासाठी खोल्या आदी व्यवस्था नसल्याने अनेकवेळा पर्यटकांची गैरसोय होते. विशेषत: महिलांना इच्छा असूनही समुद्र स्नानाचा आनंद लुटता येत नाही. समुद्रकिनाऱ्यांवरील ही अडचण दुर करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्रांना मंजूरी दिली आहे. अशा सुविधा केंद्रांसाठी समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ निश्चित क्षेत्र राखून ठेवले जाणार आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश समुद्रकिनाऱ्यांवर कपडे बदलण्याची व्यवस्थाच नाही. त्यामुळे पर्यटकांना समुद्रस्नानानंतर गोड्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी हॉटेल गाठावे लागते. समुद्रकिनारा ते हॉटेल हे अंतर ओल्या कपड्यांनिशी पार करावे लागते. त्यामुळे अनेक पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावरच आंघोळीची व्यवस्था व्हावी अशी मागणी होत होती. मात्र त्याबाबतचे धोरण निश्चित झाले नव्हते. आता पर्यटन मंत्रालयाने या संदर्भातील धोरण निश्चित केले आहे. ऑगस्ट महिन्यात शासनाने बीच शॅक्स धोरण जाहीर केले. या धोरणामध्ये सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधा केंद्रामध्ये चार प्रसाधनगृहे, सहा पाणी तुषार संच, सहा कपडे बदलण्याच्या खोल्या, 50 लॉकर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी (प्रत्येकी ५) या सुविधा उपलब्ध असतील. तसेच जीवरक्षक जाकीट, जीवरक्षक पट्टा माफक दरात पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याची परवानगीही देण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडेल अशी साधनसामुग्री ठेवण्यात येणार आहे.
अशा सार्वजनिक सुविधांकेंद्रासाठी शासना प्रत्येक समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशमार्गावर काही जागा आरक्षित करणार आहे. सुविधा केंद्राचा आरखडा व वापरायचे साहित्य यांचे तपशील ठरविण्याचा अधिकारही पर्यटन संचालनालयाकडे राहील. संगणकीय लॉटरी पध्दतीने हे सुविधा केंद्र तीन वर्ष चालविण्याचा ठेका देण्यात येणार आहे. त्यामध्ये अशासकीय संस्था, व्यावसायिक संस्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. आवश्यक परवानग्या ठेकेदाराने घ्यायच्या असून त्यासाठी पर्यटन संचालनालय एक खिडकी योजना राबविणार आहे.
——————————————————————————————————————————————————————————————————————————————————-
मागे वळून पहाताना……
आमदार भास्कर जाधव पर्यटन राज्यमंत्री असताना या सर्व कल्पना त्यांनी मांडल्या होत्या. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चेजिंग रुम, समुद्र स्नानानंतर गोड्या पाण्याने आंघोळीची व्यवस्था असावी. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळेल असेल केंद्र गुहागरमध्ये उभे रहावे यासाठी ते प्रयत्नशील होते.