जि.प. पडवे गटात ओबीसी समितीच्या सभेत अध्यक्ष पांडुरंग पाते यांचे आवाहन
गुहागर : तालुक्यातील जिल्हा परिषद गटात ओबीसी संघर्ष समन्वय समितीची सभा नुकतीच आबलोलीतील कुणबी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्वांनी आपापल्या समाज संघटनेच्या माध्यमातून सर्व ताकदीनिशी ओबीसी लढ्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर तालुका अंतर्गत जिल्हा परिषद गटनिहाय उपसमित्या स्थापन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. सभेच्या प्रास्तविकात सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी जिल्हा परिषद गटात ओबीसींचा ओबीसींची संघटित ताकद उभी करण्यासाठी व सर्व न्याती ज्ञातींनी आपले सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. सल्लागार कृष्णा वणे यांनी होऊ घातलेली २०२१ ची जनगणना ही जातिनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. यासाठी शासन पातळीवर, न्यायालयीन व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे असे सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक असूनही ओबीसींना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळत नाही. यासाठी आपण सर्वांनी आपल्या समाज संघटनेच्या माध्यमातून सर्व ताकदीनिशी ओबीसी लढ्यासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
पांडुरंग पाते यांनी जिल्हा परिषद गटातील गाव निहाय व समाज निहाय आढावा घेतला. त्यानंतर सर्व ज्ञातींचा सहभाग असेल अशा सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच ओबीसी समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ओबीसी समाज घटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात येणार्या माहिती पत्रकाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. पडवे गटातील ओबीसींच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी गटातील समितीची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकारी निश्चितीसाठी आबलोली येथे शनिवार दिनांक १९ डिसें. रोजी सकाळी ०९ ते ११ या वेळेत सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या सभेला समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते, समन्वयक कृष्णा वणे, रामचंद्र हुमणे, सरचिटणीस नीलेश सूर्वे, जि. प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, पं. स. सदस्य रवींद्र आंबेकर, विलास गुरव, वनिता डिंगणकर पूजा कार्य कर नरेश निमुकर, मधुकर असगोलकर, मुकुंद पानवलकर, शशिकांत पवार, तुकाराम निवाते, रवींद्र कुळे, विजय पागडे यासह बहूसंख्य ओबीसी बंधू-भगिनी उपस्थित होत्या. शेवटी निलेश सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.