गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि कोकणातील प्रसिद्ध उदयोजक शाळीग्राम खातु यांच्या हस्ते उद्योजकता विकास कक्ष व इन्क्युबेशन केंद्राची स्थापना करण्यात आली.
In Patpanhale Arts, Commerce and Science College located in the central place of the taluka Entrepreneurship Development Room and Incubation Center was set up in the presence of Bhalchandra Chavan, President of Patpanhale Education Society and Shaligram Khatu, a well known entrepreneur from Konkan.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना भविष्यातील उद्योजक तयार व्हावेत, आपल्या परिसरातील व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत तसेच व्यवसायातील बदलते प्रवाह कसे आहेत व नवनवीन संकल्पना कोणत्या आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनात व्हावी. तसेच त्यांनी नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे तयार व्हावेत या उद्देशाने उदयोजकता विकास कक्षाची व इन्क्युबेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. महाविदयालयातील इन्क्युबेशन केंद्राला महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तत्रंज्ञान सहाय्यता केंद्राने नुकतीच मान्यता दिली.
खातू मसाले उद्योग समूहाचे मालक शाळीग्राम खातु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण उद्योजक म्हणुन घडताना कशा प्रकारे अनुभव आले, कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला व त्यातुन खातु मसाले उद्योगाची उभारणी कशा प्रकारे केली, याचे सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांनी प्रगती करावयाचे असल्यास नोकरीकडे न जाता व्यवसायाकडे वळल्यास त्याचा कशा प्रकारे फायदा होवु शकतो हे स्पष्ट केले. आपली परिस्थिती जरी प्रतिकुल असली तरी व्यवसायामध्ये जावुन आपली प्रगती करू शकतो हे विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले. व्यवसायाची निवड करताना अभ्यासपुर्व निवड केल्यास व भीती बाळगली नाही तर प्रगती करण्याची संधी आपल्याला चालुन येते हे त्यानी सांगितले. व्यवसाय करताना बँकेपेक्षा प्रबळ इच्छाशक्ती हेच आपले भांडवले असते हे स्पष्ट केले.
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण यांनी या उद्योजकता विकास कक्ष व इन्क्युबेशन केंद्राला आपल्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर मुंबईकडे न जाता आपल्या परिसरात राहुन नोकरीपेक्षा उद्योगाची कास धरून वेगळा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. आर. जी. जाधव यांनी हे केंद्र या परिसारात एक रोल मॉडेल ठरेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रसाद भागवत यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उद्योजकता विकास कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष खोत यांनी केले. कार्यक्रमाला पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, संचालक रत्नाकर आग्रे, अनंत चव्हाण, पाटपन्हाळे हायस्कुलचे मुख्याध्यापक शंकर हिरवे, श्रीमती सौंदेकर, सर्व प्राध्यापक व पुण्यातील नामवंत समुपदेशक प्रदीप आठवले उपस्थित होते.