गुहागरात शिवतेज फाउंडेशनचा उपक्रम
गुहागर : येथील शिवतेज फाउंडेशन संस्थेच्यावतीने शहीद झालेल्या भारतीय जवानांना व सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व जवानांप्रती कृतज्ञता म्हणून दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील श्री साई मंदिरामध्ये एक दिवा शहीदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोनामुळे काही मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमाबरोबरच शिवकालीन इतिहासाची जपणूक करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन संस्थेतर्फे गड – किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेतला जातो. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची व कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. श्री साई मंदिरात व मंदिर परिसरात दिवे लावून झाल्यानंतर शिवतेज फाऊंडेशनचे संचालक संचालक राजेंद्र आरेकर, जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, भाजप महिला तालुकाध्यक्ष श्रद्धा घाडे यांनी बोलताना भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पुढील वर्षी या उपक्रमा बरोबरच ज्या जवानांनी बलिदान दिले व कर्तव्य बजावत आहेत अशा जवानांच्या कुटुंबियांना शिवतेज फाउंडेशन व जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाला शिवतेज फाऊंडेशनचे सचिव निलेश गोयथळे, खजिनदार गणेश धनावडे, संचालक विकास मालक, मनोज बारटक्के, सुहास सातार्डेकर, अंकुश विखारे, कलोपासक महिला मंडळाच्या अध्यक्ष उमा बारटक्के, सुप्रिया वाघधरे, सारिका कनगुटकर, सोहम सातार्डेकर, अर्चना बारटक्के आदी उपस्थित होते.