कोरोना नियमांचे पालन करुन मंदिरात धार्मिक कार्यक्रमही सुरु
गुहागर : मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाल्यावर श्री दुर्गादेवी देवस्थानने भक्तांसाठी भक्तनिवास सुरु केला आहे. मात्र भक्तनिवासाच्या खोल्यांचा वापर झाल्यावर पुढील २४ तास त्यामध्ये अन्य भक्ताला रहाता येणार नाही. अशी नियमावली देवस्थानने तयार केली आहे. श्री दुर्गादेवीचे दर्शनाबरोबरच येथील देवस्थानमध्ये होणारे सर्व धार्मिक विधी देखील देवस्थानने सुरु केले आहेत. मात्र हे विधी श्रींच्या पादुकांवर होतील. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली.
भक्तनिवासामधील कोरोना सुरक्षेविषयी बोलताना किरण खरे म्हणाले की, देवस्थानने खोली सॅनिटाईझ करण्याचे मशीन घेतले आहे. त्यामुळे भक्तनिवासामधील खोलीचा वापर झाल्यानंतर संपूर्ण खोली सॅनिटाईझ करुन घेतली जाणार आहे. ऑक्सिमिटर आणि टेंम्परेचर गनने तपासणी करुनच भक्ताला भक्तनिवासात प्रवेश देण्यात येईल. भक्त राहुन गेल्यानंतर त्या खोलीतील बेडशिट, पिलो कव्हर आदी साहित्य धुवून, जंतुनाशक पाण्यातून बुडवून काढून पुन्हा वापरले जाणार आहे. त्यामुळे एक भक्त राहून गेल्यावर २४ तास ती खोली वापरता येणार नाही असा नियम केला आहे.
श्री दुर्गादेवी देवस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना हातपाय धुवून, हात सॅनिटाईझ करुन आणि मास्क लावूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. देवस्थानमधील सर्व धार्मिक विधी देखील सुरु करण्यात आले असून श्री पादुकांवर हे विधी केले जातील. कोरोना संदर्भातील नियमांची काटकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देवस्थानमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भक्तांनी या सूचनांचा अवलंब करावा. देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी केले आहे.