डॉ. विनय नातू : या नेत्यांना जनतेची दिशाभुल करणेच ठाऊक
गुहागर, ता. 22 : ज्या नेत्यांना कधीही आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या उद्योगधंद्यांला लावावे असे वाटत नाही. जे नेते पोटापाण्याकरीता धंदा करणाऱ्यांना परवाने देऊ शकत नाहीत. पण त्यांना दारुचे परवाने शहरात देतात येतात. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार. नेत्यांना जनतेची दिशाभुल करण्याची सवय झाली आहे. असे प्रतिपादन आज उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी गुहागरमध्ये केले.
शहरातील भंडारी भवन येथे जागतिक मत्स्यदिनाच्या निमित्ताने नीलक्रांती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना डॉ. नातू म्हणाले की, कोणताही आदर्शवाद नसलेले महाविकास आघाडीचे सरकारामधील मंत्री आणि आमदार वेगवेगळी वक्तव्य करुन लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सत्ताधारी असलेल्या माजी मंत्र्यांनी भाजपचे जे कार्यकर्ते दारुधंदेच करत नाहीत अशांची नावे पोलीस ठाण्यात देवून तक्रार केली होती. चिपळूणातल्या एका व्यक्तिला हाच नेता वृत्तवाहिनीवर भाजपचा कार्यकर्ता ठरवून मोकळा झाला. वास्तविक थोडी माहिती घेतली असती तर आम्ही ती व्यक्ती भाजपशी दुरान्वयेही संबंधित नाही. असे स्पष्ट पत्र पोलीस ठाण्यात दिल्याचे कळले असेत. पण त्यांना स्वत:ला काही करता येत नाही. म्हणून भाजपची बदनामी करण्याचे काम सभेत, वाहिन्यांना मुलाखती देवून ते करतात.
गुहागर चिपळूण तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांवरील ॲकेशियाची झाडे तोडणारे कोण आहेत याची यांना माहितीच नाही. राष्ट्रवादीचे कोण कार्यकर्ते रात्रीच्या वेळी झाडे तोडून विकतात. याची यादी आमच्याकडे आहे. पण हे भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करतात. पोलीस ठाण्यात जा , तक्रार करा. सरकार तुमचे आहे. पोलीस तुमचे आहे. पण यांना काहीच करायचे नाही. केवळ जनतेची दिशाभुल करायची असा उद्योग सुरु आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांना आमदारांना आदर्श भुमिकांच सर्वांसमोर ठेवता येत नाही. यांचा एक मंत्री म्हणतो जिल्ह्यात अमुक ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. दुसरा म्हणतो कॉलेज आमच्याकडे झाले पाहिजे. तिसरा म्हणतो जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झाले की त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वांना प्रवेश मिळेल. मेडिकल कॉलेजमधील सर्व जागा जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्याचा नियम मंत्र्यांनी, आमदारांनी कुठून काढला हे कळत नाही. जिल्ह्यातील मुले मेडिकलला जायला हवी असतील तर नीट स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध झाले पाहिजे. ही यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. त्याबाबत कोणीच बोलत नाही. लोकांना मेडिकल कॉलेजचे स्वप्न दाखवून जागा खरेदीचा व्यवसाय तर यांना करायचा नाही ना अशी शंका येत आहे. ज्या जिल्ह्यात शासकीय जागा मिळेल तेथे मेडिकल कॉलेज करा. त्याची चर्चा कशाला करता. यांच्यात आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्याची स्पर्धाच लागली आहे.
आज देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती निर्माण झाली आहे. अजुनही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन बेडची यंत्रणा उभी राहीलेली नाही. त्याकडे यांचे दुर्लक्ष सुरु आहे. असे दिशाभुल करण्याचे उद्योग आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर योजना समाजात पोचवून चांगले उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. असे आवाहन यावेळी डॉ. नातूंनी मांडले.