संचालक मंडळाचे व गुहागरवासियांचे मानले आभार
गुहागर : कृषी, तंत्रज्ञान, सहकार, क्रीडा, अभिनय, शिक्षण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारे अष्टपैलु व्यक्तिमत्व या सोबतच मराठी मधील नामवंत सिध्दहस्त लेखक, १४ कादंबऱ्या ६ कथासंग्रह ४ नाटके १ एकांकिका तसेच कृषी सहकार संकीर्ण विषयावरील १९ पुस्तके आणि झेप हे प्रदिर्घ आत्मकथन अशी विपुल साहित्य संपदा असणारे ख्यातनाम जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार डॉ . तानाजीराव चोरगे यांचे नाव गुहागरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या सभागृहाला दिल्यानंतर प्रथमच डॉ तानाजीराव चोरगे यांनी वाचनालयाच्या नूतन वास्तु व सभागृहाला सदिच्छा भेट दिली व सभागृहाला डॉ. तानाजीराव चोरगे असे नाव दिल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर सर्व संचालक मंडळ व तमाम गुहागरवासियांचे आभार मानले. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व वाचन चळवळ जोपासण्याचे महत्वपुर्ण काम हे वाचनालयाच्या माध्यमातून होत असल्याने वाचनालये जोपासण्यासाठी पर्यायाने वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वाचनालयांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याची भावना डॉ चोरगे यांनी बोलताना व्यक्त केली.
गुहागरचा सांस्कृतिक व साहित्यिक वारसा जोपासणारे ज्ञानरश्मि वाचनालय वाचन संस्कृती जोपासण्यासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा व सहकार्य राहणार असल्याचेही त्यावेळी त्यांनी सांगितले . जगभरातील साहित्यिकांचे व वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या “साहित्य कस्तुरी ” या मासिकाच्या व साहित्यिक संस्थेच्या बोधचिन्हाचे त्यावेळी डॉ. चोरगे व प्रकाश देशपांडे यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी मसापचे कोकण विभागीय समन्वयक व लोटीस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, जिल्हा बॅकेचे गुहागर संचालक डॉ. अनिल जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदचे व ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष कवी राजेंद्र आरेकर, संचालक अरूणा पाटील, अशोक आठवले, सुप्रिया बारटक्के, संजय मालप, अॅड. संकेत साळवी, बाबासाहेब राशिनकर, ईश्वर हलगरे, ज्ञानेश्वर झगडे, सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, सोनाली घाडे, शामली घाडे, आश्विनी जोशी आदी उपस्थित होते.