गुहागर : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील मराठी वाडमय चर्चा मंडळाच्या वतीने कथा समीक्षा कवितेच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. हे मंडळ १९२७ पासून मराठी भाषाविषयक विविध उपक्रम राबवित आहे. असे जुने दिर्घकालीन काम करणारे मंडळ असल्यामुळे यांचे पुरस्कार साहित्य जगतात मानाचे प्रतिष्ठेचे समजले जातात. यात गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीची विशेष साहित्य पुरस्कारासाठी परीक्षकांनी निवड केली आहे.
या कादंबरीस मिळालेला हा सहावा पुरस्कार असून कोरोनामुळे हा पुरस्कार ऑनलाईन स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे. डॉ. लबडे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती वाडमय चर्चा मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद गोगटे, दै तरूण भारतचे संपादक, उपाध्यक्ष श्री किरण ठाकूर, प्रमुख प्रा. ईनास फर्नांडीस, कार्याध्यक्ष श्री. अनिल पाटणेकर यांनी नुकतीच एका निकालपत्रकाद्वारे कळविली आहे.
पिपिलिका मुक्तिधाम ही मराठी कादंबरीच्या परीवर्तनाच्या टप्प्यावरील कादंबरी म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, पहिली उत्तर आधुनिक मेटाफर म्हणून मराठी असलेली कादंबरी म्हणून आंतरराष्ट्रीय तौलणिक साहित्य अभ्यासक डॉ. आनंद पाटील यासारख्या अनेक साहित्यिक संशोधक समीक्षकांनी परीक्षणे लिहून तिचा गौरव केला आहे. एक वेगळी कादंबरी ग्रंथाली प्रकाशनने दिली याची वाचंकामध्ये सर्वदूर चर्चा आहे.”पिपिलिका मुक्तिधाम” ही चार मुंग्यांच्या परकाया प्रवेशाची गोष्ट आहे. जिची तुलना आंतरराष्ट्रीय कादंबर्यांबरोबर झाली आहे. आणि तिचे आंतरराष्ट्रीय स्थान अधोरेखन इंग्रजीच्या प्राध्यापकांनी देखील केले आहे.
डॉ. बाळासाहेब लबडे हे खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर येथे मराठी विभाप्रमुख म्हणून आहेत. ते साहित्यिक, समीक्षक, कवी, कादंबरीकार, संपादक, संशोधक, गीतकार ,आहेत. त्यांची आत्तापर्यंत १२ पुस्तके प्रकाशित आहेत त्यांना राज्यस्तरिय १८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.