गुहागर शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना इशारा
गुहागर : आरजीपीपीएल कंपनीच्या एलएनजी जेटी परिसरात गेल कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या बॅकवॉटरचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. सदरील काम या कंपनीने बालाजी प्रा. लि. ला दिले असून या कामात स्थानिकांना डावलून तालुक्याबाहेरील ठेकेदारांना कामे दिले जात असल्याने गुहागर तालुका शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सोमवारी गुहागर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत कंपनी अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी धारेवर धरले. यापुढे तालुक्याशी संबंध नसणाऱ्याना ठेका देऊ नका, स्थानिकांचा प्राधान्यक्रमाने विचार करा, असा इशारा देण्यात आला.
तहसीलदार लता धोत्रे यांच्या उपस्थितीत गेल, कोकण प्रा. लि., एल अँड टी, बालाजी प्रा. लि. व गुहागर तालुका शिवसेना अशी संयुक्त बैठक पार पडली. आ. भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवसैनिक स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवत आहेत. आज आरजीपीपीएल कंपनीत सब ठेका असलेल्या ठेकेदाराकडून अनेक लहान मोठी कामे निघत असतात. अशा कामांमध्ये स्थानिक ठेकेदार व कामगारांना डावलले जाते. एलएनजी जेटी परिसरात बॅकवॉटरचे काम काही वर्षे चालणार आहे. या कामाला लागणारे कामगार व यंत्रसामग्रीसाठी तालुक्यातील स्थानिकांचा प्राधान्यक्रमाने विचार करावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने केली होती. परंतु, सदरील कंपनीने या कामाचा ठेका बालाजी प्रा. लि. कंपनीला दिला असून त्यांच्या माध्यमातून बाहेरील कामगार व ठेकेदार निवडले जात आहेत. याबाबत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईस्थित चाकरमानी गेले अनेक दिवस आपल्या गावी अडकून पडले आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला पाहिजे. इथल्या लहान-मोठ्या ठेकेदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून इथली कामे केली पाहिजेत, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी या अधिकाऱ्याने सांगितले. गुहागर नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दीपक कांगुटकर यांनी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प असो वा गेल आणि एच एनर्जी कंपनीचे गॅस पाईपलाईनचे काम या सर्वच कामांमध्ये स्थानिक कामगारांना व ठेकेदारांना सातत्याने डावलण्याचे प्रकार होत आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात अनेक कामे कोणालाही विश्वासात न घेता सुरू आहेत. यापुढे कोणत्याही कंपनीची अशा प्रकारची बेबंदशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा गुहागर शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांनी दिला.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, माजी बांधकाम सभापती दीपक कनगुटकर, युवा सेना उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, शहर अधिकारी राकेश साखरकर, उपशहरप्रमुख मनीष मोरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप सुर्वे, पं. स. सदस्य रवींद्र आंबेकर, शिव वाहतूक सेना शहर संघटक सुरज सुर्वे, समील कणगुटकर, राजेंद्र साळवी, वीरेश बागकर, रोहन भोसले, संदीप निमुणकर, निलेश धामणस्कर, उदय मोरे, मंगेश पवार, सचिन मोहिते, मारुती होडेकर, मयूर भोसले, श्रीधर नाटेकर, नंदकुमार रोहिलकर, प्रवीण पालशेतकर आदी उपस्थित होते.