रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २० कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश देणार आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली.
बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. चोरगे यांनी ही माहिती दिली. या वेळी कार्यकारी संचालक सुनील गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण, सुधीर गिम्हवणेकर, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आदींसह सभासद, संचालक ऑनलाइन सहभागी झाले होते. डॉ. चोरगे म्हणाले, आरबीआयच्या निर्बंधामुळे गतवर्षी सभासदांना लाभांश देणे शक्य झाले नाही; मात्र यंदा १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. यावर्षी बँकेच्या नफ्यात १७ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवी २ हजार २२३ कोटी रुपयांच्या झाल्या असून स्वनिधी १८५ कोटी आहे. बँकेला सलग दहाव्या वर्षी अ ऑडिट वर्ग मिळाला. कोरोना विषाणूच्या कालावधीत बँकेतील सर्वांनी चांगले काम केले. ४७ कोटी रुपयांचा एनपीए वाढला होता. त्यातील २६ कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली असून शिल्लक असलेली २१ कोटी रुपयांची वसुली लवकरच पूर्ण होईल. बँकेतील गुंतवणूका ८१८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. राज्य शासनाकडे ३ हजार ५७६ कोटी ३० लाख रुपयांच्या कर्ज उभारणीचा प्रस्ताव बँकेने पाठविला आहे. बँकेचे भागभांडवल १ हजार ५८८ कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.


डॉ. चोरगे म्हणाले, बँकेने ९३ कोटी ५५ लाख रुपयांची कर्ज निर्लेखित केली होती. त्यापैकी ५५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ३८ कोटी ३९ लाख रुपयांची वसुली शिल्लक आहे. त्यात २२ कोटी रुपयांची मुद्दल, १५ कोटी रुपयांचे व्याज यांचा समावेश आहे. कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांसाठी एकरकमी परतफेडी योजना जाहीर केली आहे. व्याजदरात सवलत असलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेतला पाहिजे.
कार्यकारी संचालक सुनील गुरव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. बँकेला ब्ल्यू रिबन बँको उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नागिरी मराठा मंडळातर्फे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचा सत्कार करण्यात आला.