महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम
गुहागर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागरच्या वतीने विविध आरोग्य साहित्य तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.
To overcome the Corona crisis, various health materials were handed over to the taluka health system on behalf of the Guhagar taluka branch of the Maharashtra State Primary Teachers Association.
आज जगावर कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असताना पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. या विभागांना सहकार्य करण्यासाठी शासनाच्या वेळोवेळी आलेल्या निर्देशानुसार तालुक्यातील शिक्षक बांधव त्यांच्यावरील कोरोनाविषयक कामगारी योग्यरित्या पार पाडत आहेत. तरी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागरच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी आवश्यक असे साहित्य वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून अपेक्षित यादी मागवली व नियोजन केले. या उपक्रमासाठी तालुका भरातील शिक्षकांना वर्गणीसाठी आवाहन करण्यात आले. आणि शिक्षकांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री कैलास शार्दूल यांनी सांगितले की; शिक्षक बांधवांकडून जमलेल्या 1 लाख 50 हजार 570 रुपये वर्गणीतून आरोग्य साहित्य खरेदी करण्यात आलेले आहे. आणि सदर साहित्य हे आरोग्य विभागाकडून आलेल्या अपेक्षित यादीपेक्षा जास्त आहे. हे केवळ शिक्षक बांधवांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाले. विशेष बाब म्हणजे तालुक्यातील 150 आशा वर्कर आहेत, ज्या फ्रंट लाईनला काम करतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकी एक आरोग्य किट देण्यात आले. ज्यात फेसशिल्ड, सॅनिटाझर, N95 मास्क व हँड ग्लोजचा समावेश आहे. तसेच पल्स ऑक्सिमिटर-20, कॉफी मग -6, वाटर हिटर -10, हँड सॅनिटाईझर- 650, सॅनिटाईझर कॅन 5 लि.-12, हँड ग्लोज- 650, N95 मास्क- 850, वाफेचे मशीन -2, रुग्णांना 5 दिवस रोज दोन वेळा दोन अंडी व फळे आदी साहित्य उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वीताई निमुनकर यांनी शिक्षक हे नेहमीच प्रशासनासोबत काम करत असतात आणि आज या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. सामाजिक जाणिवेतून केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. उपसभापती सिताराम ठोंबरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तहसीलदार श्रीम. लता धोत्रे यांनी शिक्षकांचे काम काटेकोर आणि नियोजनबद्ध असते त्यामुळे प्रशासन नेहमीच त्यांच्यावर विश्वास ठेवते. आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील शिक्षक अतिशय संवेदनशील आणि समाजाप्रती जबाबदारीचे भान ठेवून काम करणारा आहे हे दिसून आले, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या कामाचे कौतुक करताना शिष्यवृत्ती असो किंवा अन्य कामाच्या माध्यमातून शिक्षक संघ समाजाशी जोडला गेलेला आहे. अशा भावना व्यक्त केल्या. तर, गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनीही माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या उपक्रमात शिक्षकांनी उत्तम सहकार्य केल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी घनश्याम जहांगीड यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून तालुक्यातील शिक्षकांचीही उपस्थिती प्रातिनिधिक स्वरूपाची होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत झगडे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास शार्दुल, तालुकाध्यक्ष दिपक साबळे, तालुका नेते भारत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र रेडेकर, शिक्षक पातपेढीचे संचालक सुनील रामाने, जेष्ठ नेते तुकाराम निवाते, शिक्षक संघाचे तालुका सरचिटणीस नंदकुमार पवार, तालुका कार्याध्यक्ष दीपक रामाने, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर हलगरे, सुनील नार्वेकर, बाबासाहेब राशीनकर, संतोष गावडे, दत्ताराम समगिस्कर, प्रेमेंद पाटील, प्रताप देसले, जाधव सर, संजय कुळे, प्रभाकर कांबळे, अजय खेराडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष श्री दिपक साबळे सर यांनी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.