रत्नागिरी- रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केलेल्या आवाहनानुसार संकलित झालेल्या निधीमधून चिपळूण येथील पूरग्रस्त ३९ कुटुंबांना सहा लाख २८ हजार २१५ रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
मदतीच्या आवाहनानंतर कऱ्हाडे हेल्पलाईन संघाचे सभासद, ज्ञातीबांधव, कऱ्हाडे ब्राह्मण महासंघ, केजीएन सरस्वती फाउंडेन यांच्याकडून ६ लाख २८ हजार २१५ रुपयांचा निधी जमा झाला. त्याचे वितरण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, डॉ. शरद प्रभुदेसाई, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, दिलीप ढवळे, मानस देसाई, अतुल आंबेकर, सेक्रेटरी सौ. शिल्पा पळसुलेदेसाई आणि ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे सचिव संदीप कळके यांनी चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी निधी घरी जाऊन दिली.
चिपळूणच्या ज्ञातीबांधवाने स्वतः पूरग्रस्त असूनही कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या मदतकार्यासाठी आर्थिक योगदान दिले. कऱ्हाडे हेल्पलाइनतर्फे एक लाख ९० हजार ८१७, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे ५० हजार, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सभासदांचे एक लाख १२ हजार २१५, कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाने २१ हजार, केजीएन सरस्वती फौंडेशन ट्रस्टतर्फे दोन लाख ५४ हजार १८३ असा एकूण सहा लाख २८ हजार २१५ रुपयांचा निधी संकलित झाला. या मदतीचे चिपळूणमधील महापूरग्रस्त ३९ कुटुंबांच्या प्रत्यक्ष घरी भेट देऊन वाटप करण्यात आले. निधी उभारणीकरिता मदत करणाऱ्या संस्था, व्यक्तींच्याप्रती माधव हिर्लेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.