17 राज्यातील सुमारे 3, 325 विद्यार्थी, प्राध्यापकांचा सहभाग
गुहागर : इच्छा असेल तर शैक्षणिक संस्था किती नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू शकतात. याचा आदर्श मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाने समोर ठेवला आहे. या महाविद्यालयाने देश पातळीवर प्राध्यापकांसाठी 4 वेबिनार, 1 प्रश्र्नमंजुषा, विद्यार्थ्यांसाठी 5 प्रश्र्नमंजुषा आणि 2 वक्तृत्त्व स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन केले. यामध्ये 17 राज्यातील 1325 प्राध्यापक आणि सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत मूल्यमापन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. सुरेश सुतार यांच्या पुढाकाराने हे उपक्रम आयोजित करण्यात आले.
बदललेल्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी शिकत असलेल्या विषयांमधील काही कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. असे सुचविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे MOOCS आणि MOODLES या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारद्वारे प्राध्यापकांना भारत सरकारच्या कौशल्य शिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. त्यासाठी इन्सिस्ट्युट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन (आयडॉल), मुंबई विद्यापीठ चे तज्ज्ञ शिक्षक प्रा. मंदार भानुशे व प्रा. कनिश्क खत्री यांनी मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये 7 राज्यातील 375 प्राध्यापक सहभागी झाले होते.
महाविद्यालयातील ग्रंथापालांना ग्रंथालय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी ग्रंथालय विभागाच्यावतीने Emerging Technologies & Next Generation Libraries या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक डॉ. मिता राठोड सुरत, डॉ. नंदकुमार दहिभाते व श्री. किशोर इंगळे पुणे यांनी वेबिनारला संबोधित केले.
कोकणातील ग्रामदेवता ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे व स्थानिक इतिहासाला चालना देणे. यासाठी कोकणातील ग्रामदेवता या विषयावर इतिहास विभागाच्यावतीने ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी, जी.आर. पाटील महाविद्यालय मुंब्रा, मुंबई हे तज्ञ मार्गदर्शक लाभले.
अंतर्गत मूल्यमापन समितीच्या वतीने नॅकची सुधारित कार्यप्रणाली या विषयावर राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापकांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली. नॅकच्या सुधारित कार्यप्रणालीवर मार्गदर्शन करणे व नॅक ला सामोरे जाताना मुलभूत माहितीची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना करून देणे हा या कार्यक्रम घेण्यामागचा प्रमुख उद्देश होता.
अर्थशास्त्र व वाणिज्य विभागांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ चा जागतिक उद्योग व व्यापार झालेल्या परिणाम या विषयावर, डॉ.एस आर रंगनाथान यांचे ग्रंथालय क्षेत्रातील योगदान यावर राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा व ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.
महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एन.एस.एस, प्रबोधन मंच व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “COVID -19 AWARENESS PROGRAME” या नावाने माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. ज्याचे संपादन महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार आकाश जांभारकर याने केले तर कुमारी कविता तामुन्डकर हिच्या आवाजात या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. लोकांनी जागतिक महामारी दरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत जनजागृती करण्यात आली.
मराठी विभागाच्या वतीने प्र.के.अत्रे यांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर राज्यस्तरीय, इंग्रजी विभागाच्या वतीने एच.जी.वेल्स यांचे इंग्रजी साहित्यातील योगदान या विषयावर, एन.एस.एस. व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कला वा संस्कृती या विषयावर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तर इंग्रजी विभागाच्या वतीने डी.एच. लॉरेन्स : रेल्म ऑफ रीयालीझम यावर तसेच हिंदी विभागाच्यावतीने हिंदी और राष्ट्रीय एकात्मता या विषयावर राष्ट्रस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
या उपक्रमांना राज्यभरातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांनी यावर आपली मते मांडून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती प्रा. डॉ. सुतार यांनी दिली. महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार खोत, सहायक समन्वयक प्रा. विकास मेहेंदळे, प्रा. डॉ. सत्येंद्र राजे आदी प्राध्यापकांनी हे सर्व उपक्रम राबवण्यात विशेष योगदान दिले आहे. या अभिनव उपक्रमाचे मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मधु चव्हाण, सर्व संचालक, प्राचार्य विजयकुमार खोत, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.