जयभारत मच्छीमार सोसायटीचे अतिक्रमण; विजय नार्वेकर यांची तक्रार
गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत क्षेत्रात खारवी समाजाला स्मशानभुमीकरीता दिलेल्या जमीनीवर जयभारत मच्छीमार संस्थेने अतिक्रमण केले आहे. मच्छीमार सोसायटीने स्मशानभुमीतच डिझेलची टाकी ठेवल्याने अपघात होवू शकतो. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभिर्याने पाहून योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी पालशेतमधील सामाजिक कार्यकर्ते विजय नागवेकर यांनी केली आहे.
याबाबात बोलताना विजय नागवेकर म्हणाले की, ग्रामपंचायत पालशेतने खारवी समाजाच्या स्मशानभुमीकरीता २७ गुंठे जमीन होडेकर, जाक्कर आणि पाटील यांच्याकडे सुपूर्त केली. वहिवाटदार म्हणून या तीन आडनावांची नोंद केली. त्यावेळी स्मशानभुमीकरीता असा स्पष्ट उल्लेख सातबारा, फेरफार आदी दस्तऐवजांवर करण्यात आला आहे. या जमीनीमध्ये अन्य कोणतेही बांधकाम करायचे असेल, वापरात बदल करायचा असेल तर मा. जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसा उल्लेख फेरफार क्र. ३७९४ मध्ये करण्यात आला आहे. मात्र शासनाची कोणतीही परवानगी न घेता या जमीनीमध्ये ५० फुट लांब, ४० फुट रुंद आणि ७ फुट उंच अशी डिझेलची टाकी बांधण्यात आली आहे. सदर टाकीचा व्यावसायिक वापर जयभारत मच्छीमार सोसायटी करत आहे. त्याचप्रमाणे टँकरमधील डिझेल सदर टाकीत भरता यावे यासाठी मातीचा भराव टाकून रॅम्पही करण्यात आला आहे.
खारवी समाजाला स्मशानभुमी करीता दिलेल्या जागेवर जयभारत मच्छीमार सोसायटीने अतिक्रमण केले आहे. डिझेलसारखा ज्वालाग्राही द्रवपदार्थ स्मशानात असल्यामुळे अंत्यसंस्कारांचे वेळी कोणताही अनर्थ घडु शकतो. शिवाय ही जागा लोकवस्तीत आहे. सदर जागेपासून अवघ्या १५ फुटावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. दुर्दैवाने अपघात घडल्यास त्याचे स्वरुप तीव्र होऊ शकते. त्यामुळे बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्या जयभारत मच्छीमार सोसायटीने तातडीने ही टाकी काढून टाकावी. स्मशानभुमी सुरक्षित करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय नागवेकर यांनी केली आहे. या संदर्भात विजय नागवेकर यांनी मुख्यमंत्री, विधी व न्याय विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसीलदार गुहागर, उपविभागीय अधिकारी (महसुल) चिपळूण आणि गटविकास अधिकारी गुहागर यांच्याकडे तक्रार केली आहे.