हे शक्तिपीठ हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र जिल्ह्यात आहे. दिल्लीपासून ५५ कि.मी. आणि कुरुक्षेत्र रेल्वेस्थानकापासून झाशी मार्गावर ४ कि.मी.वर हे शक्तिपीठ आहे. हे मंदीर द्वेपायन सरोवराजवळ असून मंदीर परिसरात दक्षिणमुखी हनुमान, गणेश, भैरव, सूर्ययंत्र व दक्षेश्र्वर महादेव ही मंदीरे आहेत. भक्तनिवासही बांधण्यात आला आहे. कुरुक्षेत्र ही कौरव पांडवांची युद्धभूमी म्हणून आपल्याला ज्ञान आहेच. सतीदेवीच्या समर्पण कथेनुसार सतीदेवीच्या उजव्या पायाचा गुल्फ म्हणजे टाचेचा भाग येथे पडला आणि ह्या शक्तिपीठाची निर्मिती झाली.
वामनपुराण आणि ब्रह्मपुराणामध्ये कुरुक्षेत्राच्या संदर्भात चारकुपांचे वर्णन आहे. चंद्रकूप, विष्णूकूप, रुद्रकूप आणि देवीकूप. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी शिवाचाही वास असतो. इथल्या शक्तिचे नांव सावित्री आणि भैरवाने नाव स्थाणू असे आहे. ह्या पीठाला सावित्रीपीठ, देवीपीठ, कालिका पीठ किंवा आदिपीठ असेही म्हणतात. देवीचे मंदिर भद्रकाली मंदीर म्हणून प्रसिध्द आहे. मंदिरातील मूर्ती चतुर्भुजा असून देवीचे स्वरुप कालिकामातेप्रमाणे उग्र नसून सौम्य आहे. ही भद्र म्हणजे मंगल करणारी कालीमाता आहे.
भगवान गोपाळकृष्ण आणि बलरामांचा मुंडणसंस्कार येथे झाला होता. असा पुराणात उल्लेख आहे. महाभारतातील युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी विजयीचा आशिर्वाद घेण्यासाठी अर्जुनाला ह्या मंदिरात नेले होते. तेथे अर्जुनाने देवीची मनोभावे पूजा केली आणि विजयी झाल्यानंतर माझ्याकडचे सर्वोत्तम घोडे तुला अर्पण करीन अशी प्रार्थना केली. युद्ध संपल्यानंतर अर्जुनाने आपल्या रथाचे घोडे देवीच्या सेवेसाठी अर्पण केले. तेव्हापासून नवसपूर्तीसाठी देवीला यथाशक्ती सोने, चांदी, मातीचे घोडे अर्पण करण्याची येथे प्रथा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी देवीला सूत्र अर्पण करुन भक्त आपल्या रक्षणाची जबाबदारी देवीवर सोपवतात. चैत्री नवरात्र व अश्विन नवरात्र हे दोन वार्षिक उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
देवीच्या विविध रुपांची माहिती देणारा श्र्लोक :
जयंती मंगलाकाली, भ्रदकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते ।।
(आपल्या भक्तांना जय देते जयंती, मोक्ष देते ती मंगला, प्रलयकाळी सृष्टीचा घास घेते ती काली, भक्तांचे भद्र म्हणजे शुभ करते ती भद्रकाली, मुंडमाळा धारण करते ती कपालिनी, उपासनेने साध्य होते ती दुर्गा, सर्व जगाची क्षमाशील जननी ती क्षमा, सर्वांचे शिव म्हणजे कल्याण करणारी ती शिवा, जगाताला धारण करणारी ती धात्री, यज्ञातील हविर्भाग देवतांना पोहोचवणारी ती स्वाहा आणि श्राद्धतर्पणाचा स्विकार करुन पितरांना पोहोचवणारी ती स्वधा अशा विविध रुपातील जगन्मातेला मी वंदन करते. )
सौ. सुरेखा वैद्य, गुहागर
राष्ट्र सेविका समितिचे आराध्य दैवत – श्री अष्टभूजा देवी
सर्वसामान्य व्यक्तीला अमूर्त कल्पना लक्षात येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक कल्पनेला मूर्तस्वरुप देवून ते प्रतिक स्वरुपात सर्वांसमोर मांडणे ही भारतीय संस्कृति आहे. राष्ट्र सेविका समितिने स्त्रीयांमध्ये असलेले गुण, तिची सुप्त इच्छाशक्ति, कार्यरत व्हावी यासाठी १९५० अष्टभूजा देवीचे प्रतिक सेविकांसमोर ठेवले. स्त्रीमध्ये प्रेरक, तारक व मारक अशा तीन शक्ती असतात. अष्टभूजा देवीच्या हातातील कमळ, गीता, स्मरणी प्रेरणा शक्तिचे प्रतिक आहेत. तर तारक शक्तिचे प्रतिक वरदहस्त आहे. तर त्रिशुळ, खङग हे मारक शक्तिचे प्रतिक आहे. अशाप्रकारे तीनही शक्ती अष्टभूजांमध्ये एकवटलेल्या आहेत. देवी अष्टभुजेला आठ हात आहेत. हे आठ हात स्त्रीयाच अष्टावधानी असणं सूचवात. एकाचवेळी तिचं लक्ष अनेक ठिकाणी असतं. ती जागृत असते. सतत क्रियाशील असते. परिवाराचा विचार करत असते. आपणही सर्व गृहिणी आधुनिक अष्टभूजाधारी सेविकाच आहोत.