नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा भाजप मुख्यालयात रंगली आहे. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार येत्या मंगळवारी होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हा विस्तार केला जाणार आहे. यूपीतून तीन-चार चेहऱ्यांना स्थान दिले जाणार आहे, तर उत्तराखंडमधून राज्यसभेचे खासदार आणि भाजपच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल बलूनी यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये जागा मिळणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रातून दोन नेत्यांच्या नावांचीसुद्धा चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सरू आहे. याशिवाय कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशामधून बैजयंत पांडा यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.
मागच्या वर्षी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रात सरकार आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्यातील राजकीय क्षेत्रातही या सर्व घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
रेल्वेसाठी सिंधियांचेही नाव
सिंधिया यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची दाट शक्यता आहे. पण, त्यांना शहर विकास किंवा मानव संसाधन मंत्रालयाचीही जबाबदारी मिळण्याच्याही चर्चा सुरू आहे. सिंधिया यांना भाजपमध्ये येऊन 15 महिने झाले आहेत. आता भाजप त्यांना दिलेले वचन पूर्ण करणार आहे. मोदी हे ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रिपद देतील. याचे कारण म्हणजे, मनमोहन सरकारमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर एक ऍक्टिव्ह मंत्र्याची इमेज बनवली होती. त्यांच्या याच इमेजचा फायदा भाजपला होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी!