राजेश बेंडल; नगररचनाकारांकडे मांडली नगरपंचायतीची भूमिका
गुहागर, ता. 21 : शहरवासीयांना विकास हवा आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती, सीआरझेडमुळे येणाऱ्या अडचणी यांचा विचार करुन, पर्यटनाला पूरक असा विकास आराखडा (Development Plan of Guhagar) तयार करावा. अशी नगरपंचायतीची भूमिका असल्याचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
शहर विकास आराखड्याची (Development Plan of Guhagar) पहिली पायरी म्हणून सध्या वापरात असलेल्या जमीनींचा नकाशा नगर रचना विभाग रत्नागिरीने तयार केला आहे. या नकाशा सर्व लोकप्रतिनिधींसमोर आज ठेवण्यात आला. गुहागर, वरचापाट तर्फे गुहागर आणि गुहागर किर्तनवाडी असे तीन महसुली भागांचे स्वतंत्र नकाशे आणि त्यातील माहिती रचना सहाय्यक अजय यादव यांनी दिली.
विश्र्लेषण करताना नगर रचनाकार श्रीकांत प्रभुणे म्हणाले की, हा नकाशा मंजूर झाल्यावर प्रस्तावित विकास आराखड्याचे काम सुरु होईल. त्यावेळी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडूनही त्यांना विकास आराखड्यात कोणत्या सुविधा हव्या आहेत याची माहिती मागवली जाईल. त्याचप्रमाणे 2041 च्या जनगणनेचा विचार बाग, मैदाने, शाळा, दवाखाना, मंडई आदी गोष्टीसाठी जागा आरक्षित केली जाईल. ही आरक्षणे ज्या जमिनीवर निश्चित होतील त्या जागामालकाला योग्य मोबदलाही दिला जातो. किंवा तितकी जागा बांधकाम व्यावसायिकाला विकण्याचा वैशिष्ट्यपूर्ण अधिकार सदर जागामालकाला दिला जातो. शहर विकास आराखड्याला मंजूरी मिळाल्यानंतर आरक्षित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया संबंधित विभागाला दोन वर्षात पूर्ण करावी लागते. (Development Plan of Guhagar)
त्यानंतर झालेल्या चर्चेच्या वेळी प्रस्ताविक विकास आराखडा (Development Plan of Guhagar) स्थानिक लोकांना विश्र्वासात घेवून व्हावा. त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जनतेला नको असलेल्या गोष्टींवर विनाकारण आरक्षण टाकु नका. सीआरझेडमुळे आधीच बांधकामांवर निर्बंध आहेत. एका बाजुला समुद्र आणि दुसऱ्या बाजुला जंगलाने व्याप्त डोंगर अशा लांबलचक पट्ट्यात गुहागर वसलेले आहे. यामध्ये अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. काही नागरिकांकडे घराएवढीच जागा आहे. अनावश्यक आरक्षणे टाकून त्यांच्या अडचणी वाढणार नाहीत. याची काळजी विकास आराखडा बनविताना घेण्यात यावी. अशी नगरपंचायतीची भूमिका असल्याचे राजेश बेंडल यांनी स्पष्ट केले.