खा. सुनील तटकरे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली : रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविय यांची भेट घेऊन रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील ९ मासेमारी बंदरे व १६ फिश लँडिंग सेंटर केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून उभारण्यात यावीत, या मागणीचे निवेदन खा. तटकरे यांनी केंद्रीय नौवहन राज्य मंत्र्यांची भेट घेऊन दिले. यावेळी खा. सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत ९ बंदरांपैकी रु. ५५८.६ कोटींचा अंदाजे खर्च असलेल्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर आहे. या बंदरासह जीवना व आगरदांडा बंदरांना विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. या ठिकाणी मरीन फूड पार्क, सीफूड रेस्तराँ व आर्ट गॅलरी असावी, असे सुचवले आहे.
या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्त होऊन सुरक्षित व स्वच्छतेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तर निर्माण करता येईल. आईस प्लान्ट, कोल्ड स्टोरेज, आधुनिक ऑक्शन हॉल अशा गोष्टींचा यात समावेश असावा, असे सुचवले आहे. मासेमारी व्यवसायाला नवी चालना मिळण्यासाठी या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्याची विनंती खा. तटकरे यांनी केली आहे. मंत्री महोदयांनी या निवेदनावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.