राजेश बेंडल, 14 व्या वित्त आयोगातून निधीसाठी प्रक्रिया सुरु
गुहागर, ता. 05 : मदत आणि पुनर्वसन खात्याकडून निधी न मिळाल्याने आणि 14 व्या वित्त आयोगातून निधी आणण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांचा करार वाढवता आला नाही. मात्र लवकरच 6 जीवरक्षकांना गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर तैनात करण्यात येईल. अशी ग्वाही गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी गुहागर न्यूजला दिली. (Deploying Lifeguard)
पाच महिने पगार न मिळाल्याने 30 डिसेंबरला 2 जीवरक्षकांनी समुद्रावरील देखरेकीचे काम थांबवले. 31 डिसेंबरच्या गर्दीच्या वेळी तसेच पर्यटन हंगाम सुरु झाल्याने समुद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुहागर नगरपंचायतीने स्वच्छता आणि सफाई कामगारांची नियुक्ती केली. हे कर्मचारी पर्यटकांना सूचना देण्याचे काम करत आहेत. त्यावरुन सध्या गुहागर नगरपंचायतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. (Deploying Lifeguard)
याबाबत गुहागर न्यूजशी बोलताना नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, 2018-2019 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून निधी मिळाल्याने आपण 6 जीवरक्षकांना प्रशिक्षण देवून कामावर घेतले. 2020 मध्ये हा निधी संपण्यापूर्वी 4 महिने नगरपंचायतीने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव मदत व पुनवर्सन खात्याकडे पाठवला. मात्र कोविड महामारीमुळे 6 जीवरक्षकांच्या मानधनासाठी निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीने 4 जीवरक्षकांची कपात करुन केवळ 2 जीवरक्षकांना नगरपंचायत फंडातून पगार देण्याची तरतुद केली. फंडातील तरतूद संपल्यानंतर जीवरक्षकांना वेळेवर पगार देवू शकत नाही याची पूर्वकल्पना दिली होती. (Deploying Lifeguard)
दरम्यानच्या काळात निधीसाठी पाठपुरावा सुरु होता. डिसेंबर 2021 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी 14 व्या वित्त आयोगातून निधी देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्याबाबतची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे. हा निधी मंजूर झाला की पुन्हा एकदा शासनाच्या निकषाप्रमाणे 6 प्रशिक्षित जीवरक्षक गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर नियुक्त केले जाणार आहेत. (Deploying Lifeguard)