न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागविले
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरून न्यायालयाने गुरूवारी केंद्र सरकारकडून उत्तर मागवले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उसळला. त्यामुळे त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. ती याचिका उत्तरप्रदेशस्थित वकील रंजना अग्निहोत्री आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंदर सिंह यांनी सादर केली आहे. बंगालमधील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सशस्त्र/निमलष्करी दले तैनात करण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला जावा.
निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराची कारणे शोधण्यासाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) स्थापनेचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरून न्यायालयाने नोटिसा बजावून केंद्र सरकारबरोबरच बंगाल सरकार आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवले.निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हजारों लोकांचा छळ करण्यात आला. हिंसाचारात भाजपच्या किमान 15 कार्यकर्ते आणि समर्थकांना जीव गमवावा लागला, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय राजी झाले आहे. त्या सुनावणीमुळे बंगाल ढवळून निघण्याची चिन्हे असून राजकारणही तापण्याची शक्यता आहे.