मतदार संघातील तिन्ही तालुक्यात संघटनेला बळ देणार
गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव यांच्यावर खासदार सुनील तटकरे यांनी गुहागर विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. मतदार संघातील गुहागर, खेड व चिपळूण तालुक्यातील भागात पक्ष संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष पदासाठी राजेंद्र आरेकर, विजय मोहिते यांच्यासह पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते दीपक जाधव इच्छुक होते. याबाबत त्यांनी गुहागर न्युजशी बोलताना आपले मत व्यक्त केले होते. गुहागर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी रिक्त तालुकाध्यक्ष पदाबरोबरच विधानसभा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस पदाची निवडही जाहीर केली. यावेळी खा. तटकरे यांनी दीपक जाधव यांनी पक्ष संघटना वाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
खा. तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यासह इतर दोन तालुक्यातील पक्षाचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे गुहागर तालुक्यातील गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करत होतो, त्याचप्रमाणे यापुढे संपूर्ण मतदार संघातील नागरिकांसाठी आपण योगदान देणार आहे. राजकारण आणि समाजाभिमुख कामांवर अधिक जोर आपण देणार आहोत. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास यापुढील काळात नक्कीच सार्थ करून दाखवेन, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.