२० एकर क्षेत्रावर १ लाख हळद रोपांची तयारी : सचिन कारेकर
गुहागर : आबलोली येथील प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या हळदीच्या SK-4 (स्पेशल कोकण-४) वाणाची यंदा रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २० एकर क्षेत्रावर लागवड होणार असून यापैकी १० एकरची लागवड ही हळकुंडापासून तर १० एकर ची लागवड ही हळकुंडापासून तयार केलेल्या रोपांच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सचिन कारेकर यानी दिली.
The SK-4 (Special Konkan-4) of turmeric developed by progressive farmer Sachin Karekar will be cultivated on an area of about 20 acres in Ratnagiri district this year.
गेली २० वर्ष हळद लागवड करून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांनी निवड पद्धतीने SK-4 (स्पेशल कोकण – ४) हळदीच्या वाणाची नवीन जात विकसित केली. गेल्या ४-५ वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यासह शेजारच्या सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांपर्यंत हे हळदीचे वाण पोहचले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन व हवामानात उत्तम प्रकारे उत्पादित होऊ शकणारे व किड रोगाला प्रतिकारक अशा या हळदीचे वाण आता शेतक-यांपर्यंत पोहचू लागले आहे.
शेतकऱ्यांकडून SK-4 बियाण्याची लागवड करण्याकडे असलेला ओढा लक्षात घेता डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यानी हळकुंडापासून रोपे तयार करणयाचे विकसित केलेले तंत्रज्ञान अवलंबून या वर्षी गुहागर व मंडणगड तालुक्यात अनुक्रमे प्रत्येकी ५०,००० प्रमाणे 1 लाख रोपांची निर्मिती करण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. गुहागर तालुक्यात आबलोली येथे २०,०००, कोतळूक येथे २०,०००, निगंडळ येथे १०,००० , मंडणगड तालुक्यात कुंबळे येथे ५०,००० अशी एकूण १ लाख रोपे लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे. तर १० एकर क्षेत्र हे हळकुंड बियाण्यापासून लागवडीखाली येणार असल्याचेही सचिन कारेकर यानी सांगितले.
सचिन कारेकर हे हळद लागवडीबाबत वारंवार प्रशिक्षण वर्ग आयोजित करून शेतक-यांना योग्य असे मार्गदर्शन करीत असतात. या पद्धतीचा शेतक-यांनी तंतोतंत अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मंडणगड तालुक्यातील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी तेथे ५ एकर क्षेत्रावर हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम करून तालुक्यात प्रथमच उत्तम प्रकारे लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे ४०,००० रोपांची रोपवाटिकाही तयार केली असल्याचे कारेकर यांनी सांगीतले.