श्रम व वेळेची बचत; एकाच यंत्रात भात, नाचणीची मळणी
गुहागर : येथील कुलस्वामिनी चौक येथील ओंकार इंजिनिअरिंग सोल्युशन्सचे ओंकार संतोष वरंडे यांने कौशल्याला कल्पकतेची जोड देत छोटे मळणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचला आहे.
Omkar Engineering Solutions at Kulswamini Chowk Omkar Santosh Varande has created a small threshing machine by adding skill to ingenuity.This machine has reduced the labor of the farmers and also saved time.
गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध वरंडे विमा सेवा केंद्राचे सर्वेसर्वा आणि सलग दहावेळा विमा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एमडीआरटी पुरस्कार मिळवणारे विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांचा ओंकार हा सुपुत्र आहे. ओंकार याचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गुहागर हायस्कूल मध्ये झाले. तर अकरावी, बारावी एस. पी. कॉलेज, पुणे येथे झाले. त्यानंतर पुण्याच्या सिंहगड कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग बी.ई. मॅकेनिकल पदवी प्राप्त केली. हे शिक्षण घेत असतानाच नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा अशी इच्छा मनाशी बाळगली होती. त्यानुसार २०२० मध्ये वरवेली येथे ओंकार इंजिनिअरिंग सोल्युशन्सची स्थापना केली. चार तरुणांच्या मदतीने सर्वप्रकारची वेल्डिंगची कामे सुरू केली.


दरम्यान, गेली दीड वर्ष कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे नुकसान झाले. अनेक उद्योगही बंद पडले. शेतकऱ्यांची कामे थोड्याफार अडथळ्यांनंतरही सुरू होती. या काळातच ओंकारला काहीतरी वेगळे बनविण्याची कल्पना सुचली. अवकाळी पावसामुळे भात कापणीनंतर दाणे गळण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी लवकरात लवकर भात झोडणी करावी लागते. कोकणात पारंपरिक पद्धतीने हाताने झोडून मळणी काढण्याचा प्रकार आहे. याकामासाठी मनुष्यबलाची कमतरता, त्यातच वाढलेल्या मजुरीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे त्रासाचे ठरत आहे. परिणामी शेती कमी होऊ लागली आहे. मात्र, अलीकडे सर्वच क्षेत्रात कामासाठी यंत्राचा वापर वाढला आहे. यामुळे माणसांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचत आहे. पूर्वी ज्या कामांना महिन्याचा कालावधी लागत असे, ती आता काही दिवसात पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांच्या याच अडचणीची दखल घेऊन ओंकारने आपल्या कामाच्या ठिकाणी भात झोडणी यंत्र बनविण्यासाठी सुटे भाग आणून छोटे प्रयोग करायला सुरुवात केली.
ओंकारने कौशल्याला कल्पकतेची जोड देत छोटे मळणी यंत्र तयार केले. सद्या बाजारात भात व नाचणी मळणीसाठी दोन वेगवेगळी यंत्रे उपलब्ध आहेत. परंतु, दोन यंत्रासाठी जास्त किंमत मोजावी लागते. त्याऐवजी या एकाच यंत्रात दोन कामे होऊ शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचाहि फायदा होतो. तसेच ओंकारने बायोशेडर यंत्रहि बनविले आहे. या यंत्राचा उपयोग नारळ-सुपारीच्या झावला, सोढणे व इतर रानटी झाडांच्या फांद्यांचा बारीक चुरा करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. हा चुरा खत म्हणून वापरला जातो. हे यंत्र अश्वशक्तीच्या विदूत मोटारवर चालते. यासाठी तीन फेजचा विदूत पुरवठा आवश्यक आहे. ग्राहकाच्या गरजेनुसार डिझेल इंजिनचा सुद्धा वापर करता येणे शक्य आहे. भविष्यात अशाच प्रकारची अत्याधुनिक यंत्रे विकसित करून शेती व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ओंकार वरंडे याने सांगितले.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अनेक यंत्रे बनवून त्याची कमी किंमतीत विक्री करण्याचा मानस आहे. किंमत कमी करण्यासाठी वापरलेल्या घटकांचा दर्जा कमी केला नाही. उलट चांगल्या दर्जाच्या शाफ्ट, बेअरिंग, पत्रे, अँगल, पुली यांचा वापर केला आहे. हे यंत्र पॉवर टिलर, सिंगल फेज मोटारवरही चालू शकते. छोट्या मळणी यंत्रामुळे खर्चात बचत झाली. विनाकारण मोठे यंत्र घेण्याची गुंतवणूक करावी लागत नाही. शेतकऱ्यांचे मळणीचे काम सुलभ झाले. कमी मनुष्यबळातही काम होते. एकूणच श्रम व वेळ यांची बचत होते. आकाराने लहान असल्याने वाहतूकही सोपी. जिल्ह्यातील सर्व भात उत्पादक पट्ट्यामध्ये हे मळणी यंत्र नक्कीच उपयोगी ठरेल, असा विश्वास ओंकारने व्यक्त केला आहे.

