सौ. अमृता जानवळकर : गावाच्या सहकार्यामुळेच सेवा करण्याची ऊर्जा मिळाली
सर्वसामान्य माणसे जेव्हा कोरोना रुग्णाचे वाढते आकडे पाहून घरबसल्या चिंतेत पडत होती. परंतू 18 मार्चपासून आजतागायत सणवार, वैयक्तिक जीवन, वैयक्तिक अडीअडचणी दूर ठेवून आशा सेविका, आरोग्य सेवक / सेविका, कोविड सेंटरमधील डॉक्टर आदी कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. कोरोनाबद्दलची भिती, कुटुंबाची चिंता दूर सारून या कोरोना योद्ध्यांनी कसे काम केले याची माहिती वाचकांना व्हावी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील एका आशा सेविका आणि आरोग्य सेविकावर लिहिलेला लेख खास गुहागर न्यूजच्या वाचकांसाठी.
गुहागर : गेले सहा महिने गावालाच घर समजून जानवळेच्या सात वाड्यांमध्ये काम करणाऱ्या सौ. अमृता जानवळकर या तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविका आहेत. त्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 50 कोरोना रुग्ण आढळले. असे असतानाही गावात वाद, भांडण, नाराजी निर्माण न होता एकमेकांविषयी सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. रोजच्या दगदगीमुळे त्या स्वत: आजारी पडल्या (कोरोना नाही) तेव्हा ग्रामस्थांनी आस्थेने त्यांची चौकशी केली. गावाने दिलेला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि पतीचा आधार यामुळेच हे काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे त्या आवर्जुन सांगतात.
गुहागर तालुक्यातील जानवळे हे गाव शृंगारतळीपासून 1 कि.मी. अंतरावर आहे. शृंगारतळीमध्ये पहिला रुग्ण 17 मार्चला सापडल्याने या परिसरातील कोरोना योद्धांचे काम 17 मार्चपासूनच सुरू झाले होते. जनजागृती करायची, सर्व्हे करायचे म्हणजे पायपीटही आलीच. सौ. अमृता यांच्याकडे जानवळे गावातील जानवळकरवाडी, ओझरवाडी, सुकाडवाडी, वाणीवाडी, कोंडविलकरवाडी आणि मोहल्ला या 7 वाड्यांची जबाबदारी होती. 18 मार्चपासून शृंगारतळी परिसरात आरोग्य तपासणी सुरू झाली त्या पथकात त्यांचा समावेश होता. या तपासणीनंतरही त्यांना उसंत मिळाली नाही. मुंबईसह अन्य शहरातून लोक गावी येऊ लागले. त्यामुळे रोज कार्यक्षेत्रात फिरण्याचे काम सुरू झाले.
पती अंकुश, दोन मुले अथर्व (वय 12) आणि अनिकेत (वय 15) असे त्यांचे चौकोनी कुटुंब. कोरोना संकटात रक्तदाब आणि मधुमेह असल्याने अकुंश यांना देखील पत्नीची काळजी होती. आपल्याला कोरोना झाला, विलगीकरण कक्षात रहावे लागले तर या तिघांचे काय होणार अशी चिंता सौ. अमृतांना भेडसावायची. अशा ही परिस्थितीत रोज सकाळी सर्वांचे जेवण करून सौ. अमृताताई 8 वा घराबाहेर पडायच्या. सात वाड्यांमध्ये जाऊन सर्व्हे करायचा. सर्दी ताप खोकल्याचा रुग्ण असेल तर दोन दिवसांच्या औषधांचा डोस द्यायचा. गावाबाहेरची व्यक्ती येणार असेल तर त्या व्यक्तीला विलगीकरणात रहायला स्वतंत्र जागा आहे का याची माहिती घ्यायची. औषध देऊनही बरा न झालेल्या रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला कळवायची. असे काम करून दुपारी 1 वा. त्या घरी येत असतं. दुपारचे भोजन घेतल्यावर तपासणीसाठी पाठवायच्या रुग्णांना त्या भेटत. तयार रहायला सांगत. रुग्णवाहिका आली की तपासणीसाठी पाठवत. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना, कुटुंबाला विलगीकरणासंदर्भात माहिती देत. आपल्या कार्यक्षेत्रात किती रुग्ण आहेत, त्यातील संस्थात्मक विलगीकरणात किती, गृहविलगीकरणात किती, खासगी दवाखान्यात उपचार कोण घेतय या सर्वाची नोंद ठेवत. गृहविलगीकरणातील रुग्णाची चौकशी करणे, ऑक्सिजन, ताप तपसाणे, आदी कामांबरोबरच त्या रुग्णाला येणाऱ्या अडचणी समजूत घेण्याचे कामही सौ. अमृताताई करायच्या. यातच दिवस संपून जायचा. घरी आल्यावर दिवसाभराच्या कामाचा अहवाल बनविण्याचे किचकट कामही करायला लागायचे. त्यामुळे 18 मार्चपासून स्वत:चं असं जीवनच उरलं नव्हत. घराचं लॉजिग बोडिंग झाल होतं. तरीही सौ. अमृता रोज नव्या उत्साहाने कोरोना योद्धा बनून लढाईवर जायच्या.
सौ. अमृताताई सांगतात…
अनेकवेळा एखादी व्यक्ती आजारी आहे हे पटवून देण्याचे काम आम्हालाच करायला लागायचे. ती व्यक्ती मला काही होत नाही असेच सांगायची. कुटुंब नाराज व्हायचे. पण हे आपल्या भल्यासाठी आहे हे त्यांना नंतर उमगायचे. रोजच्या दगदगीने, धावपळीने मी ही थकले. तब्येत बिघडली. कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण 15 दिवस घराबाहेर पडता आले नाही. या दिवसांत ग्रामस्थांच्या प्रेमाची अनुभूती मिळाली. रोज फोन करून ग्रामस्थ चौकशी करायचे. पुन्हा कामावर हजर झाल्यावर आपुलकीने ग्रामस्थ काळजी घेण्यास सांगत. ग्रामस्थांनी सहकार्य केल्यानेच प्रतिकूल परिस्थितीतही गावाची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. हे काम करण्याची ताकद घरच्यांनी आणि ग्रामस्थांनी दिली.