सर्वसामान्य माणसे कोरोना रुग्णाचे वाढते आकडे पाहून घरबसल्या चिंतेत पडत होती. परंतू 18 मार्चपासून आजतागायत सणवार, वैयक्तिक जीवन, वैयक्तिक अडीअडचणी दूर ठेवून आशा सेविका, आरोग्य सेवक / सेविका, कोविड सेंटरमधील डॉक्टर आदी कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. कोरोनाबद्दलची भिती, कुटुंबाची चिंता दूर सारून या कोरोना योद्ध्यांनी कसे काम केले याची माहिती वाचकांना व्हावी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील एका आशा सेविका आणि आरोग्य सेविकावर लिहिलेला लेख खास गुहागर न्यूजच्या वाचकांसाठी.
गुहागर : कोविडच्या संकटात उच्च धोक्यांमधील (High Risk) रुग्णांना शोधणे, उपचार करणे ही जबाबदारी आरोग्य सेविका सौ. मीराबाई हुडे यांचेकडे होती. याशिवाय राष्ट्रीय कार्यक्रम, गरोदर मातांची तपासणीही करायला लागायची. ऑनलाईन डाटा फिडिंगचे काम होते. ही तारेवरची कसरत सुरू असतानाच पालपेणे उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी, मृत्युदर कमी राखण्यासाठी त्यांनी आरोग्यसेवक अलिमिया घारे यांनी अतोनात मेहनत घेतली.
2016 मध्ये मीराबाई हुडे (सासरचे नांव बरडे) पालपेणे उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून दाखल झाल्या. कोरोनाचे संकट आल्यावर सौ. मीराबाईंच्या आई वडिलांनी नोकरी सोडून घरी परत ये. जीव वाचला तर अधिक मेहनत करता येईल. असा आग्रह धरला. आरोग्य सेवा की आयुष्य अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या सौ. मीराबाईंना यावेळी पती गोविंद बरडे यांनी आधार दिला. गोविंद बरडे आणि दोन्ही मुले ऋषिकेश आणि अभिषेक मीराबाईंना मानसिक बळ देण्यासाठी लातूरहून पालपेण्यात आले.
सौ. मीराबाईंचे कामच मुळी अतिधोकादायक स्थितीतील रुग्णांना मानसिक आधार देणे, त्यांच्यावर तातडीने उपचार होतील हे पहाणे होते. मीराबाईंकडे पालपेणे मधलीवाडी, कुंभारवाडी, तळ्याची वाडी आणि जानवळे गाव हे कार्यक्षेत्र होते. या क्षेत्रातील आशा सेविका, अंगणवाडी सेविकांकडून येणारे अहवाल तपासणे. कोरोनाविषयी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना भेटणे. आपल्याला मिळालेले प्रशिक्षण आणि अनुभवाच्या बळावर सदर व्यक्तीला असलेली लक्षणे कोरोनाकडे जाऊ शकतात का याचे निदान करणे. त्यानुसार त्यांच्या कोविड टेस्ट करून घेणे. टेस्टचा रिपोर्ट आल्यावर सदर रुग्णाला कोठे ठेवायचे (संस्थात्मक की गृह विलगीकरणात) याचा गुप्त अहवाल वरिष्ठांकडे पाठविणे. अशी कोराना महामारीतील अत्यंत महत्त्वाच्या कामांची जबाबदारी आरोग्य सेविकांवर होती. या कामांच्या पूर्ततेसाठी फिल्डवर जावे लागायचे. शिवाय कार्यालयीन कामही करावे लागायचे. हिवताप नियंत्रण, अंधत्व निवारण, कुष्ठरोग निर्मूलन, कुटुंब कल्याण, क्षयरोग नियंत्रण, लसीकरण या सहा राष्ट्रीय कार्यक्रमांचे कामही आरोग्य सेविकांना करायला लागायचे. यापैकी एखादा रुग्ण आढळला तर त्याच्या उपचारांची व्यवस्था करणे. जुन्या रुग्णांची तपासणी करुन औषधे देणे. गरोदर मातांचे लसीकरण, त्याच्या नोंदी ठेवणे, प्रसूतिपूर्व तपासण्या, प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविणे. ही कामे देखील करावी लागत होती.
सौ. मीराबाई म्हणतात या कामाचा ताण इतका होता की, दिवस कामात आणि रात्र विचारात जायची. मुळातच सर्दी, ताप खोकला अशी लक्षणे असलेला रुग्ण मानसिकदृष्ट्या खचायचा. खोकल्याची उबळ वाढली, ताप वाढल्यावर वेळेचे भान विसरून रात्रीअपरात्री देखील रुग्ण फोन करायचे. अशावेळी मानसोपचार तज्ञाची भूमिका वठवावी लागायची.
सौ. मीराबाईंना कोरोनाच्या लढाईत एका दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याच्या कार्यक्षेत्रातील एका ज्येष्ठ ग्रामस्थाला कोरोना झाला होता. पण तो ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंब हे मान्य करायलाच तयार नव्हते. गावातील प्रतिष्ठित मंडळी, पक्ष कार्यकर्ते यांनी समजावून सांगितले. सौ. मीराबाईंनी वरिष्ठांना समजूत घालण्यासाठी बोलावले. पण ऐकतच नव्हते. अखेर तपासणीत ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे सिद्ध झाले. ऑक्सिजनची पातळी इतकी कमी झाली होती की, आरोग्य यंत्रणेने रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथूनही खोटेनाटे सांगून त्या रुग्णाने डिस्जार्च मिळवला. दुर्दैवाने या रुग्णाचा घरी येऊन मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिन शासकीय कर्मचाऱ्यांवर आली.
कर्तव्य बजावून देखील हेकेखोरपणामुळे एकजण जिवाला मुकला होता. त्याचा सौ. मीराबाईंच्या मनावर आघात झाला. यावेळी पती गोविंद यांनी मानसिक आधार दिला. आपण कर्तव्यात चुकलो नाही. त्यांच्या नशिबी तेच लिहिलं होतं. तू कोलमडू नको. अनेकांना तुझ्या कामाची गरज आहे. आरोग्य सेवेचा वसा तू घेतला आहेस. गोविंद बरडेंनी काढलेल्या समजुतीमुळे पुन्हा सौ. मीराबाई मरगळ झटकून कामाला लागल्या.
आपल्या कार्यक्षेत्रातील एक 58 वर्षीय व्यक्ती त्यांना कोरोनाची संशयास्पद केस वाटली. लक्षणे दिसत नसली तरी तपासणी करून घेवूया असे त्यांनी सांगितले. कुटुंबाने मान्यता दिल्यावर तपासणी झाली. तेव्हा ही व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. घरी राहून बरे होऊ अशी मानसिकता होती. तरीही सौ. मीराबाईंनी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले. तेथे तब्येत खालावली म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पूर्ण बरे होऊन ते पुन्हा घरी आले. या कुटुंबाने सिस्टरना घरी बोलावून धन्यवाद मानले. तो क्षण सौ. मीराबाईंसाठी अत्यानंदाचा होता.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात सर्वात वेळखाऊ आणि कंटाळवाणे काम होते ते म्हणजे टाडा फिडींगचे. रोज घेतलेल्या गृहभेटी, तपासलेल्या व्यक्ती, त्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान या सगळ्यांची ऑनलाइन नोंद देखील फिल्डवरील कर्मचार्यांनाच करायची होती. सौ. मीराबाईंनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व डाटा फिडींगचे ऑनलाइन काम स्वत: केले.
गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत न थकता, रजेवर न जाता, उपकेंद्रातील कामासोबत कोरोनामधील सर्व जबाबदाऱ्या सौ. मीराबाईंनी पूर्ण केल्या. म्हणूनच सेवेचा वसा घेऊन काम करणाऱ्या सौ. मीराबाई हुडे कोरोना योद्धा म्हणून गौरवास पात्र आहेत.