चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल जांगळेवाडीचा पुढाकार
गुहागर : गेल्याच आठवड्यात आलेल्या भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामोन्नती सेवा संघ आणि किरण कला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने जीवनावश्यक वस्तू व कपड्यांची भरघोस मदत करण्यात आली.
In collaboration with the Gramonnati Seva Sangh and Kiran Kala Mandal, which have always been doing social work to help the flood victims of last week’s catastrophic floods, a large amount of essential items and clothes were provided.
चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेडा घातल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. पुराचे पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्तांना अन्न, पाणी व कपड्यांची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून या संकटात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून ग्रामोन्नती सेवा संघ आणि किरण कला मंडळाचे सभासद आणि विशेष म्हणजे तरुणांनी दोन्ही मंडळांच्या बैठका घेऊन तसेच व्हाट्सऑपच्या माध्यमातून मुंबई व इतर ठिकाणी राहणाऱ्या मंडळाच्या सभासदांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देत मदत केली. यावेळी ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तू, कपडे व आर्थिक स्वरूपात सहकार्य केले.
घराघरातून तांदूळ, कांदे, बटाटे, तेल, पाणी आदी संसारिक साहित्याची मदत पुढे केली. पुरग्रस्तांसाठी सुरू असलेली धडपड पाहून नूतन गोपाळकृष्ण जांगळेवाडी ग्रामोन्नती सेवा संघ मुंबई यांनी यात मोठी आर्थिक मदत केली. देशी-परदेशी गेलेली मंडळी व गावातील काही दानशूर मंडळी आर्थिक सहकार्यासाठी धावून आली. विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मारुती छाया क्रीडा मंडळ व जय नाम्या क्रीडा मंडळ यांनी वस्तू व आर्थिक स्वरुपातुन मदत करताना स्वतःला या कार्यात वाहून घेतले. जय नाम्या महिला बचत गटातील महिलानी कुळीथ पीठ देऊ केले. लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक अडचणी असताना सुद्धा ‘आभाळ फाटलय त्याला कुठेतरी ठिगळ लावला पाहिजे’ या भावनेतून वस्तू व आर्थिक रुपाने जमा झालेल्या मदतीतून महिलांसाठी आवश्यक नवीन कपडे व पुरानंतरची रोगराईची समस्या बघता आवश्यक मेडिकल साहित्य (आयोडेक्स, विक्स, पायांच्या सुरक्षततेसाठी क्रीम, फिनेल ) खरेदी करण्यात आले. तसेच जमा झालेल्या साहित्यातून प्रत्येकी 28-30 वस्तू असणारे 170 ते 175 किट तयार करण्यात आली. ती चिपळूण परिसरातील कळंबस्ते, दळवटणे, वालोपा या भागातील पुरग्रस्तांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आली.
दरम्यान, पूरग्रस्तांना मदत घेऊन जाण्यासाठी ओक ब्रदर्स व गणेश सुर्वे यांनी विनामोबदला आपली वाहने उपलब्ध करून दिली. या मदत कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अखिल जांगळेवाडी तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.