गुहागर : सागरी महामार्गाचा प्रमुख टप्पा असणारा गुहागर तालुक्यातील मोडकाआगर तवसाळ मार्ग. या मार्गावरील पालशेत गावातील बाजार पुल एक महिनाभरापूर्वी दुरुस्तीच्या व कमकुवत झाल्याच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम उपविभागकडून बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा नव्याने काम पाहणाऱ्या उपअभियंता श्रीमती निकम यांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आणि नदीतील प्रवाह कमी झाल्याचे पाहून तातडीने पुलाची दुरूस्ती करुन हा पुल पुन्हा वाहतुकीस खुला करण्यात आल्याने गुहागर तालुका भाजप तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
After the rainfall subsides And the flow of the river decrease; Public Works Sub-Division Deputy Engineer, Nikam immediately repaired the Palshet Bridge and reopened for traffic. Therefore Guhagar taluka BJP congratulated the Public Works Department.
भाजपाचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पालशेत पुल सुरू करण्यात यावा, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या होत्या. पुलाची दुरुस्ती व पाण्याचा प्रवाह पाहून पूल वाहतुकीस सुरू करण्याचे आश्वासन उपअभियंता श्रीमती निकम यांनी दिले होते. त्यानुसार वेळीच दखल घेत नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर ढासळलेल्या पिलरची दुरुस्ती करण्यात आली तर पुलाच्या इतर भागाचे सिमेंट रेतीच्या साह्याने पॉइंटिंग करण्यात आले. याकरता सुमारे तीन लाख रुपये खर्च पडले आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. जटाळ, उप अभियंता श्रीमती निकम, सहाय्यक अभियंता श्री. नित्सुरे, श्री. घोरपडे यांनी पाहणी केली. आणि 30 दिवसानंतर हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला.
सा. बां. उपविभाग गुहागर यानी दाखविलेल्या कार्य तत्परतेबद्दल गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष धन्यवाद देण्यात आले. पुल जरी सुरु झाला असला तरी ज्या कारणाने पुल नादुरूस्त झाला तो झाडे काढण्यासाठी लावण्यात आलेला जेसीबी बाबतची कोणतीच कारवाई झालेली नाही. पुल वाहतुकीस खुला करण्यात आला असला तरी जून महिन्यात लाकडे काढण्यासाठी सां. बां विभागाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता गावातीलच काही अज्ञातांकडुन वापरण्यात आलेला जेसीबी, यानंतर पुल नादुरुस्त आणि कमकुवत असल्याबद्दलचे ग्रामपंचायतीचे पत्र, नविन पुलाची मागणी आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने वाहतुकीसाठी बंद केलेला पालशेतचा पुल यामागे काही पूर्वनियोजित कट तर नाही ना, अशी चर्चा पालशेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात चालू आहे. ते काही असो मात्र पालशेत पुलाचा मोडकाआगर पुल झाला नाही याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद दिले पाहिजेत.