आमदार जाधव; महामार्गाच्या कामाची केली पहाणी
गुहागर, ता. 19 : मोडकाआगर पुलासह गुहागरपासून रामपूरपर्यंतचे पहिल्या टप्प्यातील तीनपदरीकरण मे महिन्यापूर्वी पूर्ण करा. कोरोना संकटामुळे तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे. आता युध्दपातळीवर कामे सुरु करा. अशा सुचना आमदार भास्कर जाधव यांनी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला केल्या आहेत. आज आमदार जाधव यांनी थेट मोडकाआगर पुलापर्यंत जावून सुरु असलेल्या कामाची पहाणी केली.
मोडकाआगर पुलचा विषय गेली तीन वर्ष गाजत आहे. या पुलाचे काम किरकोळ असल्याचे सांगणारे अधिकारी आता पुलाच्या कामाविषयी काही बोलत नाहीत. मात्र आज आमदार भास्कर जाधव यांनी थेट मोडकाआगर पुल, पाटपन्हाळे ते मोडकाआगर सुरु असलेले तीन पदरीकरणाचे काम यांची पहाणी केली. त्यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांना पुल कधी सुरु होणार असा प्रश्र्न विचारल्यावर दोघेही निरुत्तर झाले होते. अखेर ठेकेदाराने पुढील दोन महिन्यात दुचाकी आणि कमी वजनाच्या चारचाकी वाहनांची वहातूक सुरु करण्यासाठी प्रयत्न करु. असे उत्तर देवून वेळ निभावली. मात्र आमदार भास्कर जाधव यांनी अधिकारी आणि ठेकेदाराना आता केवळ सहा महिनीचे तुमच्याकडे आहेत. या कालावधीत गुहागर ते रामपूर रस्त्याचे काम पूर्ण करावे. त्यासाठी गुहागरकडून मोडकाआगरपर्यंतच्या रस्त्याच्या कामालाही सुरवात करावी. मे महिन्यात कोणत्याही परिस्थितीत वहातूक सुरु झाली पाहिजे. अशी सूचना केली.