आरजीपीपीएल कंपनी व अंजनवेल ग्रामपंचायतीचा पुढाकार
गुहागर : अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनी व ग्रामपंचायत अंजनवेल याच्या संयुक्त विद्यमानाने येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या गोपाळगड किल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, अंजनवेल ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंता यांनी आपल्या जीवनात असलेले स्वच्छतेचे महत्व सर्वाना पटवुन देत स्वच्छता ईश्वरा समान आहे. म्हणजेच स्वच्छता स्वस्थ जीवनाचा आवश्यक भाग आहे. स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी संबधीत असतात. तुम्ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे आरोग्य निरोगी राहिल. स्वच्छतेचे महत्व समजुन घेऊन आपण स्वच्छतेबद्दल जनजागृती केली पाहीजे. ज्याप्रमाणे मानवी जीवनात अन्न, वस्त्र, निवारा गरजेचा आहे. तितक्याच प्रमाणात स्वच्छतेला महत्व दिले गेले पाहीजे. कारण अस्वच्छता साथीच्या रोगांना आमंत्रण देते. आपल्या रोजच्या सवयीमध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे. स्वच्छतेचा कंटाळा करू नका. आपण एक आदर्श आणि जबाबदार नागरीकाच्या रूपात देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावू शकतो. तसेच पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. स्वच्छता हे समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी निरोगी जीवनाकरता या अभियानामध्ये सहभागी होऊन समृद्ध राष्ट्र निर्मितीला हातभार लावला पाहिजे. आणि याची सुरुवात स्वतःच्या घरापासून शाळा महाविद्यालय, कार्यालय, संस्था, बगीचे इत्यादी ठिकाणापासून व्यापक स्वरूपात केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे एजिम सुरेश कुरुप, श्री थॉमस, एच. आर. प्रमुख जॉन फिलिप्स, सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी, ग्रामपंचायत अंजनवेल सरपंच यशवंत बाईत, उपसरपंच आत्मराम मोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सीआयएसएफ सिक्युरिटिचे जवान आदी उपस्थित होते.