गुहागर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा-चिरा उत्खननासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून दिल्याबद्दल गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले.
आमदार श्री. जाधव आज गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये आले असताना चिरेखाण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आभारपत्र व बुके देऊन त्यांचे आभार मानले. ‘आपणासारख्या कोकणातील समस्यांची जाण असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आमच्या व खाण कामगारांच्या रोजगाराच्या समस्यांचा विचार करून, शासन दरबारी आवाज उठवून व पाठपुरावा करून चिरेखाण व्यवसाय सुरू होण्यासाठी जे मोलाचे प्रयत्न केलेत आणि आम्हा सर्वांना दिलासा दिलात त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत’ असे या आभारपत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भगवान कदम यांच्यासह नवनीत ठाकूर, सतीश मोरे, सुरेश शेटे, संजय घर्वे, सुभाष सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.