मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? हे प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालेले आहे. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”मनसेचे संस्थापक राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही.”
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंप्रांतियाबद्दलची भूमिका बदलल्या शिवाय आम्ही युतीसंदर्भात चर्चाही करू शकत नाही, हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंनी मला त्यांच्या भाषणाची एक क्लिप मला पाठली होती. ते उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐका असं त्यांनी सांगितल्याने मी ते ऐकलं. ते ऐकल्यानंतरही माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्याच चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट, राजकीय चर्चा असेल तर ती, युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसंदर्भातील राजकीय चर्चा झाली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंज येथे पोहचले होते. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले असले, तरी देखील या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवाय, राजकीय वर्तुळात देखील तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे. भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत.