दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप
गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रगतशील दिव्यांग व्यवसायिक मंगेश महाडिक, संस्थेचे सल्लागार प्रकाश बापट, सरपंच पुनम रावणंग, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, संदीप भाटकर, संस्थेचे सर्व कार्यकारी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी आपल्या प्रास्ताविकात जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी बोलताना मंगेश महाडीक यांनी दिव्यांगांना खचून न जाता स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. याबाबत त्यांनी त्यांच्या काजू प्रोसेसिंग युनिट व कुक्कुट पालन याविषयी सविस्तर माहिती करून दिली. प्रकाश बापट यांनी सर्व प्रकारच्या दिव्यांगाना जगातील विविध उदाहरणे देऊन आपण कसे अपंगत्वावर मात करू शकतो हे पटवून दिले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून यूटिलिटी पावर टेक प्रा. लि. अंजनवेल या कंपनीने दिव्यांगांसाठी दिलेल्या वॉकर, व्हीलचेअर, कुबड्या व काठी या कृत्रिम साहित्याचे वाटप गरजू दिव्यांगांना करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश अनगुडे यांनी तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस सुनिल रांजणे, खजिनदार प्रवीण मोहिते, सानिका रांजाणे, अनिल जोशी, संतोष कदम, संगम रावणंग, उल्हास विचारे यांनी विशेष प्रयत्न केले.