भाजपाचे आगारप्रमुखांना निवेदन
गुहागर : येथील एसटीचे वेळापत्रक कोलमडले असून ग्रामीण भागातील प्रवाशी व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. यामध्ये वेळीच सुधारणा करण्याची मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आगारप्रमुख वैभव कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असणाऱ्या एस.टी. सेवेतील आपल्या तालुक्यातील कर्मचारी व बसेस मुंबईतील बेस्टच्या सेवेत पाठविण्यात आलेल्या आहेत. मात्र, यामुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी सेवेची व्यवस्था कोलमडली गेली आहे. तालुक्यात कार्यरत असणारे कर्मचारी व गाड्या बेस्टच्या सेवेत पाठवण्याच्या निर्णयाचा आपणाकडून पुनर्विचार होणे गरजेचे आहे.
कोरोना संक्रमणाच्या कालावधीनंतर गुहागर तालुक्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. तर काही प्रमाणात शाळा, महाविद्यालय सुरू झाली आहेत. मात्र आपल्या चुकीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नियमित प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे हाल होत आहेत. लॉकडाऊन मधील नियमात शिथीलता आल्यामुळे रोजगारासाठी विविध ठिकाणी तालुक्यातील गरजू नोकरीसाठी जात आहेत. मात्र वर्षानुवर्षे चालु असलेल्या महाराष्ट्रातील इतर शहरांकडे जाणा-या व गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या एसटी फेर्या कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्यामुळे व वाहतुकीची अन्य कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गुहागर तालुक्यातील जनतेचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
महामंडळाचे आगार गुहागर तालुक्यात असताना तालुकावासियांची गैरसोय करून अन्य ठिकाणची सोय पाहणे हे संयुक्तिक नाही तरी तातडीने आपले कर्मचारी व बसेस गुहागर आगारात परत बोलावून गुहागर वासियांना एसटीची सुरळीत सेवा देण्यास प्रारंभ करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्रद्धा घाडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय मालप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वैशाली मावळणकर, गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष हेमंत बारटक्के, महिला आघाडी गुहागर शहराध्यक्ष नेहा वराडकर, जेष्ठ कार्यकर्ते नरेश वराडकर, अमित जोशी, मंदार गुहागरकर उपस्थित होते.