गुहागर : रक्तदान हे पवित्र दान असून त्या माध्यमातून कित्येकांचे प्राण वाचवले जातात.आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवले जाणे यापेक्षा दुसरे सर्वोच्च काम असू शकत नाही म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. आज या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना लोक शिक्षण मंडळ व आयोजकांमार्फत सौर कंदील भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला त्यातून रक्तदात्यांनी रक्ता अभावी अडलेल्या गरजूंना, रुग्णांना रक्तदान करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश पाडावा असे आवाहन चंद्रकांत बाईत यांनी केले.
लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी च्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे लोकशिक्षण मंडळ आणि बाईत परिवार यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व रक्तदात्यांना चंद्रकांत बाईत यांच्या हस्ते सौरकंदील भेट त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल गावंड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.लोक शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी सचिन बाईत यांनी प्रास्ताविकात रक्तदानाची गरज अधोरेखित केली. आजच्या कोरोना आपत्तीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे आणि त्यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यांना सौरकंदील भेट देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी रक्त संकलनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री नारकर, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत, तंत्रज्ञ अंकिता बेलवलकर, लतिका लिंगायत,कक्ष सेवक संदीप पवार,कृष्णा मकवाना, संदीप वाडेकर हे उपस्थित होते. यावेळी ४८ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.शिबिराच्या यशस्वितेसाठी लोकशिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत,सचिव राकेश साळवी,संचालक अविनाश कदम, सुषमा उकार्डे, मुख्याध्यापक डी. डी. गिरी, नामदेव मेस्त्री यांसह लोकशिक्षण मंडळ आबलोली च्या ज्ञानशाखांचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली. प्रा. एस. व्ही.राजमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.