काँग्रेसची वाताहत; 5 राज्यातील 690 जागांपैकी केवळ 55 जागांवर विजय
गुहागर, ता. 10 : आम आदमी पार्टीने दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये सर्व पक्षांना धक्का देत 92 जागांवर विजय मिळवून संपूर्ण बहुमतात पंजाब राज्य सर केले आहे. तर उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि गोवा राज्यात भाजपने सत्ता संपादन केली आहे. 34 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशमध्ये पूर्ण बहुमत मिळवून भाजपने इतिहास रचला. गोव्यामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत बसण्याची संधी भाजपला मिळाली आहे. उत्तराखंड व मणीपूरमध्येही सलग दुसऱ्यावेळी जनतेने भाजपला पसंती दिली. (BJP Wins 4 State and AAP wins Punjab)
पाचही राज्यात काँग्रेसची वाताहत
आज निकाल लागलेल्या 5 राज्यातील 690 जागांपैकी काँग्रेसला केवळ 55 जागा जिंकता आल्या आहेत. उत्तरप्रदेशमध्ये यावेळी प्रियांका गांधी निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या होत्या. मात्र या राज्यात केवळ 2 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. मोदी लाटेतही पंजाबचा किल्ला कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जिंकला होता. मात्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धु यांच्या नेतृत्त्वात पंजाबमध्ये काँग्रेसची वाताहत झाली. गोवा राज्यात 10 वर्ष भाजप सत्तेत होते. त्यामुळे काँग्रेसला आशा होती. मात्र संघटना खिळखिळी झाल्याचा फटका गोव्यात काँग्रेसला बसला. उत्तराखंडमध्येही काँग्रेस जोरदार लढत देईल असे वाटत होते. मात्र तिथेही पराभवच पत्करावा लागला. सर्व राज्यात काँग्रेसचा जनाधारही कमी झाला आहे. (BJP Wins 4 State and AAP wins Punjab)
निवडणुकीतील ठळक घडामोडी (BJP Wins 4 State and AAP wins Punjab)
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची अक्षरश: त्सुनामी आलेली पहायला मिळाली. या त्सुनामीत चरणसींह चेन्नी, प्रकाश सिंग बादल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखे आजी माजी मुख्यमंत्री, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धु, माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल हे नेते आपच्या नवोदित उमेदवारांसमोर पराभूत झाले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री, भाजपचे माजी खासदार पुष्करसिंग धामी, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते हरीश रावल पराभूत झाले.
उत्तरप्रदेशमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले परंतू येथील उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे देखील पराभूत झाले.
गोव्यात भाजपने पणजीतून तिकिट न दिल्याने अपक्ष म्हणून उभे राहीलेले उत्पल पर्रिकर यांनाही पराभव पत्करावा लागला.
निवडणुकीपूर्वी भाजप सोडून समाजवादी पार्टीमध्ये सहभागी झालेले श्रम आणि सेवा मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्मसिंह सैनी यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला. स्वामी प्रसाद मौर्य यापूर्वी सलग पाच वेळा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यावेळच्या निवडणुकीत फाजिलनगर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार सुरेंद्र कुशवाह (1लाख, 16 हजार, 29) यांनी 45 हजार 14 मतांनी मौर्य (71 हजार, 15) यांचा पराभव केला.
आयुष मंत्री राहीलेले धर्मसिंह सैनी हे देखील सहारनपुर जिल्ह्यातील नकुड विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार होते. याठिकाणी भाजपचे उमेदवार मुकेश चौधरी (1 लाख 4 हजार 114) यांनी 315 मतांनी सैनी (1 लाख 3 हजार 799) यांचा पराभव केला.
ते लाखो मतांनी जिंकले (BJP Wins 4 State and AAP wins Punjab)
उत्तरप्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुनील कुमार शर्मांनी समाजवादी पार्टीच्या अमरपाल शर्मा यांना 2 लाख 14 हजार 835 मतांनी पराभूत केले.
सुनीलकुमार शर्मा यांनी 3,22,882 मते मिळविली. नोएडामधील भाजप उमेदवार पंकजसिंह यांनी 1 लाख 79 हजार मतांनी विजय मिळवला.
निवडणुकांचे अपडेट (BJP Wins 4 State and AAP wins Punjab)
गोवा – एकूण जागा : 40; निकाल जाहीर : 40
आप : 2, भाजप : 20, गोवा फॉरवर्ड : 1, कॉंग्रेस : 11, मगोप : 2, रिव्हॉल्युशनरी गोवन्स : 1, अपक्ष : 3
मणिपूर – एकूण जागा 60; निकाल जाहीर 60
भाजप : 32, काँग्रेस : 5 , जनता दल (युनाटेड) : 6, कुकी पिपल्स अलायन्स : 2, नागा पिपल्स फ्रंट : 5, नॅशनल पिपल्स पार्टी : 7, अपक्ष : 3
पंजाब – एकूण जागा 117; निकाल जाहीर 117
आप : 92, बसप : 1, भाजप : 2, काँग्रेस : 18, अकाली दल : 3, अपक्ष : 1
उत्तराखंड – एकूण जागा 70, निकाल जाहीर 70
बसप: 2, भाजप: 47, काँग्रेस : 19, अपक्ष : 2,
उत्तरप्रदेश – एकूण जागा 403, निकाल जाहीर 403
अपना दल : 12 , बसप: 1, भाजप: 254, काँग्रेस : 2, जनसत्ता दल लोकतांत्रिक : 2, निर्बल भारतीय शोषीत हमारा आम दल : 6, राष्ट्रीय लोक दल : 8, समाजवादी पार्टी : 112, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी : 6
(आकडेवारी निवडणुक आयोगाने जाहीर केलेली आहे.)