31.08.2020
गुहागर : भाजपच्या आंदोनलावर टिका करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने आंदोलन करायला हवे होते असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप तालुकाध्यक्षांनी ही मागणी म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटले आहे.
भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेपासून बंद असणारी महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे कोरोनाचे नियम पाळून उघडण्यात यावीत. याकरता भारतीय जनता पार्टीने राज्यभरात घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनाला गुहागर तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गुहागर तालुक्यांमध्ये 22 ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारी संसर्गातसुध्दा आघाडी सरकारने मदिरालये सुरु केली. मात्र सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. महाराष्ट्राच्या उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा नको. मात्र, तालुकाप्रमुखांना शाळा, विद्यालये, महाविद्यालये चालू झाली पाहिजेत. हा वैचारिक विरोधाभास हास्यास्पदच आहे. क्वॉरंटाईनच्या नियमाबाबत आजपर्यंत एकवाक्यता नाही. कोरोनाच्या संकटात रुग्ण तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या विविध सुविधांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दाखवूनही उपाययोजना होत नाही. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे केलेले हाल जनता लवकर विसरणार नाही. मुंबईहून गावी येण्याची मुदत संपल्यानंतर टोलमाफी जाहीर केली. सर्व चाकरमानी गावात पोहोचल्यानंतर एसटी आणि ट्रेन सोडल्या. यातून किती प्रवासी आले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. सत्तेत यांचा पक्ष, यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री तरीही एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे सुरु करण्यासाठी यांनी भारतीय जनता पार्टीला आंदोलन करण्याचा सल्ला द्यायचा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि शिक्षणाविषयी यांचा असलेला दृष्टीकोन याचा विचार यांचे वरिष्ठ करणार नसतील तर तालुकाप्रमुखांनी योग्य तो विचार करण्याची गरज आहे. असे सूचक विधानही तालुकाप्रमुख सुर्वे यांनी केले.