आबलोली कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
गुहागर : तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गट कार्यक्षेत्रात आलेली वाढीव वीज बिले व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या व्यथा मांडण्याकरीता भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पडवे जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आबलोली वीज वितरण कार्यालयाला घातला घेरावा घातला. भाजप कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत शाखा अभियंता श्रीमती माळकर यांनी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीने कोरोनाचे नियम पाळून योग्य नियोजन केल्यास ग्रामपंचायत स्तरावर जाऊन वीज बिलांमधील शंकांचे निरसन करू तर ऑनलाईनच्या पदवी परिक्षा संपेपर्यंत दुरूस्तीसाठीचा कोणताही मोठा शटडाऊन या गटात करणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कोरोना काळात शासनाने वीज बिल माफीचे गाजर दाखवून जनतेची फसवणूक केलेली असताना वीज वितरणने संभ्रमात टाकणारी वीज बिले देऊन वीज ग्राहकांना आर्थिक संकटात टाकले. वीज बीले न भरल्यास कर्मचारी दुरूस्तीकरीता चालढकल करत आहेत. आबलोली वीज वितरण कार्यालयातील दूरध्वनी गेले ६ महिने बंद असल्याने ग्राहकांना संपर्क करणे कठीण झाले आहे. कर्मचारी व अभियंते आपल्या सजेवर राहत नसल्याने या अडचणीत भर पडत आहे.
लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला महत्त्व प्राप्त झाले असून त्याकरीता वीजपुरवठा अखंडीतपणे सुरळीत चालू असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या परिक्षा कालावधीत वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर कोरोना कालावधीत बंद असणारे ग्रामीण भागातील लघु उद्योग उभारी घेत असताना विजेच्या खेळखंडोब्यामुळे हैराण झाले आहेत. या सर्व विषयांचा गांभीर्याने विचार करून आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अन्यथा पडवे जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या वतीने आबलोली वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तालुका उपाध्यक्ष संदिप साळवी, तालुका सरचिटणीस विजय भुवड, सचिन ओक, चिटणीस मधुकर असगोलकर, सुभाष कोळवणकर, विनायक सुर्वे, मंगेश गडदे, आंबेरे सरपंच रविंद्र अवेरे, शंकर डिंगणकर, महेश गडदे, श्रीकांत सुर्वे, राजेश सुर्वे, दिलिप भुवड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.