प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांचे देखील उद्घाटन
गुहागर : गेले अनेक वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील तळवली-परचुरी रस्त्याचे भूमिपूजन आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते नुकतेच पार पडले. तसेच आम. भास्कर जाधव आणि जि. प. सदस्य विक्रांत जाधव यांच्या निधीतून मंजूर झालेल्या प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन देखील यावेळी पार पडले.
गुहागर तालुक्यातील तळवली-परचुरी रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्यांमुळे येथून वाहन चालविणे कसरतीचे बनले होते. तर खड्यांमुळे याठिकाणी काही अपघात देखील घडले होते. या मार्गावरील सुमारे २ कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम.भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून सुमारे २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच आम.जाधव यांच्याहस्ते पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे आता वाहनचालकांचे हाल काही प्रमाणात कमी होणार आहेत. या रस्त्याच्या भूमिपूजन कामासाठी सभापती विभावरी मुळे, जि. प.सदस्य विक्रांत जाधव,उपसभापती सुनील पवार,सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्गखोल्यांच्या निकृष्ट बांधकामाबत अधिकारी वर्ग धारेवर
प्रा.मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांबाबत आम.भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त करत बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.वर्गखोल्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले असून निधीच्या प्रमाणात हे काम झाले नसल्याबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.