गुहागर पोलीसांनी केली 9 जणांना अटक
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील कोंडकारुळ येथे जमीनीच्या वादातून 10 जणांनी एका कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर चिपळूणातील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी संदिप जागकर यांने केलेल्या तक्रारीवरुन गुहागर पोलीसांनी 9 जणांना अटक केली आहे. तक्रारदार संदिप लक्ष्मण जागकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जागकर व अमोल प्रकाश झर्वे या दोन कुटुंबामध्ये रहात्या घराशेजारील जमीनीवरुन वाद सुरु आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरुन तंटामुक्ती समितीने प्रत्यक्ष जागेवर येवून हा वाद ८ दिवसांपूर्वी मिटवाला होता. मात्र बुधवारी रात्री 9 च्या सुमारास अमोल प्रकाश झर्वे, सिताराम असगोलकर, प्रशांत सिताराम असगोलकर, योगेश सिताराम असगोलकर, यशवंत गंगाजी झर्वे, अभय यशवंत झर्वे, सुहास असगोलकर, सिध्दु असगोलकर, नितेश असगोलकर आणि सौ. रंजनी सिताराम असगोलकर हे सर्वजण संदीप जागकर यांच्या घरात शिरले. त्यांनी घराची नासधुस केली. दगड मारुन घराची कौले फोडली, घरासमोरील दगडाचा बांध तोडून टाकला. संदीप जागकर यांच्या आईवडिलांना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. संदीप जागकर आणि त्यांच्या कुटुंबाने आरडाओरडा सुरु केल्यावर वाडीतील माणसांनी येवून मारहाण थांबवली. या मारहाणीत संदीपच्या आईच्या नाकातोंडातून रक्त वहात होते. रामचंद्र जागकर, राजा जागकर, सौ. सुरेखा जागकर यांनी संदीप जागकर व त्याच्या आईवडिलांना खासगी वाहनाने रात्री 11.00 वा. गुहागर पोलीस ठाण्यात आणले. पोलीसांनी रात्री 11.30 तिघांना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले. तेथून संदीपच्या आईला सौ. रेवती जागकर यांना अधिक उपचारासाठी चिपळूण येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. गुरुवारी या घटनेबाबतची तक्रार संदीप जागकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरुन गुहागर पोलीसांनी अमोल प्रकाश झर्वे, सिताराम असगोलकर, प्रशांत सिताराम असगोलकर, योगेश सिताराम असगोलकर, यशवंत गंगाजी झर्वे, अभय यशवंत झर्वे, सुहास असगोलकर, सिध्दु असगोलकर, नितेश असगोलकर या 9 जणांना अटक केली आहे.