नकली दागिने ठेवले गहाण, शाखा व्यवस्थापकांची पोलीसांत तक्रार
गुहागर, ता. 13 : वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक केली. अशी तक्रार विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरचे व्यवस्थापक मकरंद पत्की यांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. दिवाळीच्या सणातच हि तक्रार आल्याने गुहागर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शाखा व्यवस्थापक पत्की यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मिलिंद मदन जाधव रा. तरीबंदर, मनोहर महादेव घुमे रा. असगोली, गणेश शंकर कोळथरकर रा. नवानगर, श्रीमती सुलोचना दत्ताराम पावसकर रा. नवानगर, शबीया उमरखान परबुलकर रा. नवानगर, विक्रांत महादेव दाभोळकर रा. वेलदूर, राजेश गोपिनाथ भोसले रा. खालचापाट आणि श्रीमती विनया वसंत दाभोळकर रा. वेलदूर या 8 जणांनी संजय श्रीधर फुणगुसकर रा. नवानगर यांच्याशी संगनमत करुन सोन्याचे खोदे दागिने वेलदूरच्या बँकेत गहाण ठेवले. संजय श्रीधर फुणगुसकर रा. नवानगर यांनी याबाबतचे खोटे मुल्यांकन दाखले तयार करुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी नकली सोन्याचे दागिने खरे आहेत असे भासवले. त्यामुळे 5 जुलै 2019 ते 17 जुलै 2020 या मुदतीत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरचे 14 लाख 63 हजार 703 रुपये 10 पैसे इतके आर्थिक नुकसान झाले आहे. या ९ जणांनी बँकेची फसवणूक केलेली आहे. गुहागर पोलीसांनी सदरच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवून घेतला आहे. वरील 9 जणांपैकी संजय श्रीधर फुणगुसकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर याच बँकेच्या शाखा व्यवस्थापिका सौ. सुनेत्रा सुनील दुर्गोली यांचा खून केल्याचा आरोप आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव करीत आहेत.