शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांची मागणी
गुहागर : आबलोलीसह संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच वेळीच निदान होण्यासाठी आबलोलीमध्ये अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केली आहे. यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेली इमारतही उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील आबलोली ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक दृष्ट्या आबलोली हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याठिकाणी विविध कामांसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. अशावेळी बाजारपेठेतील दुकाने व अन्य ठिकाणे गर्दीने गजबजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी एखाद्या नागरिकाला कोरोनाची टेस्ट करावयाची झाल्यास त्याला वेळणेश्वर येथे कोविड सेंटरमध्ये जावे लागते. हे अंतर लांब असल्याने जोपर्यंत ग्रामस्थ जास्त आजारी पडत नाहीत. तोवर ही टेस्ट करुन घेत नाही. त्यामुळे काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. तर काहींच्या जीवावरहि बेतत आहे. यामुळे प्रशासनाने आबलोली सारख्या ठिकाणी अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून आबलोलीसह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी केली आहे.