गुहागर : तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगडा उत्सव मंदिराच्या प्रांगणात पार पडला.ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगडा पाण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक नरवण गावात दाखल होत असतात. त्यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. परंतु यंदा कोरोना संकटामुळे या बगाडा उत्सवावर बंधने आली होती. तरीही येथील देवस्थान कमिटीने कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा केला. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला देवीची जत्रा भरते.
दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी पाठीत आकडे टोचून घेतात व लाटेवर फिरतात. दुपारनंतर आकडे टोचण्याचा व लाट फिरण्याचा कार्यक्रम होतो. सुमारे तीस फूट उंचीच्या खांबावर तेवढ्याच लांबीची लाट फिरवली जाते. ज्या भक्तांना नवस फेडायची आहे ते स्वतः किंवा देवीचे मानकरी यांच्यामार्फत नवस पूर्ण केले जातात. पाठीत आकडे टोचण्यासाठी, नवस पूर्ण करणाऱ्या भाविकास देवीच्या मंदिराच्या समोर उभे केले जाते. पाठीत टोकदार आकडे टोचले जातात. त्यानंतर टोचलेल्या आकड्यासह मंदिराच्या भोवती व लाटेच्या खांबा भोवती प्रदक्षिणा पूर्ण करून देवीचा आशीर्वाद घेऊन आकडे टोचलेल्या भाविक किंवा मानकऱ्यास लाटेखाली आणले जाते. एका बाजुला त्या भाविकाला आकड्यांवर दोरीच्या साह्याने घट्ट बांधले जाते आणि दुसऱ्या बाजूने लाट फिरविली जाते. लाटेवर स्वार भाविक देवी जयघोष करीत नवस फेडण्याची कृतज्ञता व्यक्त करीत हातातली घंटा वाजवीत इच्छेनुसार एक, दोन, तीन किंवा पाच फेऱ्या पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण करतात. नंतर खाली उतरल्यानंतर आकडे काढले जातात. मात्र आकडे टोचताना किंवा काढताना भाविकाच्या पाठीतून रक्ताचाथेंब सुद्धा निघत नाही.
यावेळी संतोष नरवणकर यांना आकडे टोचण्यात आले त्यांनी ११ फेऱ्या पूर्ण केल्या. या उत्सवासाठी व्याघ्रांबरी देवी देवस्थान मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.