शालेय मुलांसाठी स्वखर्चाने भरवितोय विविध स्पर्धा
गुहागर : गेले वर्षभर कोरोना आपत्तीचा जनसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वच क्षेत्रातील माणसे कोरोना योध्दा म्हणून आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. यामध्ये आपलाही काहीप्रमाणात खारीचा वाटा असावा, या भावनेने प्रेरित होऊन गुहागर तालुक्यातील पालशेत येथील एक तरुण शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने विविध स्पर्धा भरवून कोरोनाविषय जनजागृती करत आहे. त्याच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
पालशेत साळवीवाडी क्रमांक १ आसनेश्वर मंदिर येथील शिक्षणप्रेमी व सध्या पुणे येथे अभियंता म्हणून सेवा बजावणाऱ्या उमेश शांताराम साळवी हे दरवर्षी विविध उपक्रम राबवून समाजप्रबोधन व समाजसेवा करतात. ते पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. कोरोना आपत्तीत आपणही समाजसेवा करावी, या भावनेने त्यांना कोरोना जनजागृतीपर कल्पना सुचली. त्यांनी चित्रकला स्पर्धा भरविण्याचे ठरविले. गेल्यावर्षी मार्च मध्ये त्यांनी या विषयावर स्पर्धा भरविली होती, मात्र कमी प्रतिसाद मिळाला होता. यावेळी त्यांना विद्यार्थ्यांची साथ मिळाली.
या वर्षी मार्च २०२१ मध्ये इयत्ता ५ वी, ६ वी व ७ वीसाठी चित्रकला स्पर्धा भरविली. स्पर्धेसाठी नियम पाळा, कोरोना टाळा, कोरोना काळातील एक प्रसंग हे विषय निवडले होते. या स्पर्धेत इयत्ता ५ वीतील आर्या विलास ओक प्रथम, प्रज्ञा प्रकाश घाणेकर द्वितीय, प्रथमेश संदेश कनगुटकर तृतीय, इयत्ता ६ वीमधील सिध्दी उमेश सैतवडेकर प्रथम, विराज सं. गावणंग द्वितीय, अनुष्का अनिल नितोरे तृतीय, इयत्ता ७ वीमधील अमानत अकबर नदाफ प्रथम, शिवम श्रीधर पावरी द्वितीय, साहिल ज्ञानेश्वर इतापे तृतीय यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेत एकूण २१० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थांना आवश्यक ते चित्रकला साहित्य साळवी यांनी मोफत पुरविले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जोगळेकर, कलाशिक्षक आगरे, सर्व शिक्षक, प्रल्हाद मांडवकर, चंद्रकांत साळवी कुटुंबिय यांनी सहकार्य केले. बक्षिस वितरण पालशेत गावच्या सार्वजनिक सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमात मुलांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती उमेश साळवी यांनी दिली.