पालपेणे तळ्याचीवाडी येथील प्रकार, जावई पोलिसांच्या ताब्यात
गुहागर : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील पालपेणे तळ्याचीवाडी येथे घडली. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरवेली रांजाणेवाडी येथील राजेंद्र काशिनाथ रांजाणे याला दारुचे व्यसन होते. त्याची सासरवाडी पालपेणे तळ्याचीवाडी येथे आहे. त्याची घरगुती कागदपत्रे त्याची पत्नी देत नसल्याने ती मिळावीत म्हणून तो सासूला सांगण्यासाठी आपल्या सासरवाडीत दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी गेला होता. दरम्यान, त्याची सासू सुवर्णा नारायण टाणकर (वय ५५) या घराला कुलूप लावून व शेजारी किल्ली ठेऊन सकाळी ८.३० च्या सुमारास रेशनिंगवर धान्य आण्यास गेल्या होत्या. त्या पुन्हा १०.३० वा. आपल्या घरी आल्या व कुलूप उघडून घरामध्ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांचा जावई मागच्या दाराने आतमध्ये येऊन बसल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी नशेमध्ये असलेल्या जावयाने मला कागदपत्रे आपल्या मुलीला देण्यास सांगावे असे सांगितले. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी त्याने सासूच्या डोक्यावरील धान्याचे पोते फेकून दिले व तिचे तोंड दाबून त्याच्या हातातील कोयत्याने सासूच्या डोक्यावरील डाव्या कानाच्या पाठिमागे आणि मानेवर असे चार वार केले. त्यानंतर त्याने तेथील शेजारच्या लोकांना हा प्रकार सांगितला व पळून गेल्याची तक्रार सुवर्णा टाणकर यांनी केली आहे.
दरम्यान, जखमी सुवर्णा टाणकर यांच्यावर अधिक उपचार रत्नागिरीत येथे नेण्यास सुरू आहेत. जावई राजेंद्र रांजाणे याला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक कदम करीत आहेत.