पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची खडी उखडली; ग्रामस्थांमधून संताप
गुहागर : तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत दर्जाहीन झाले असून पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची खडी उखडून आली आहे. संबंधित कामाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधी देखील याकडे डोळेझाक करत आहेत.यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
Asphalting work of Talwali Shevariphata to Hospital Stop Road is of poor quality. The work has been neglected by the contractor and the people’s representatives are also turning a blind eye to it.


गुहागर तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप हा मार्ग नेहमीच वर्दळीचा राहीला आहे. या मार्गाची दुरुस्ती अनेक वेळा केली गेली मात्र ठोस गटारांची व्यवस्था होत नसल्याने हा रस्ता अल्पावधीतच नादुरुस्त होऊन मोठं मोठे खड्डे पडले जातात. यावर्षी देखील या मार्गावरील रस्त्याचे डांबरिकरण करण्यात आले असून ठेकेदाराने केलेले हे डांबरीकरण देखील अर्धवट अवस्थेत असल्याने या रस्त्याची खडी साईडपट्टीकडून मोठ्या प्रमाणात उखडून येत आहे.
या रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले असून पुढील काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही खडी उखडून जाऊन हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनणार आहे. सद्या साईडपट्टीला ठेकेदाराने मातीचा भराव टाकून मलमपट्टी केली असून यामुळे आता पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरून रस्त्याची दुर्दशा होणार आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.



