श्री शनेश्वर फाउंडेशन मुंबई संस्थेचा पुढाकार
गुहागर : श्री शनेश्वर फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील तेली समाजातील विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वैद्यकीय अभियांत्रिकी, संगणक शास्त्र,व्यवस्थापनशास्त्र इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस., इत्यादी उच्चश्रेणीच्या पदांसाठी होणार्या प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम निवडीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यस्तरीय प्रथम श्रेणीच्या प्राथमिक परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, भौतिक, रासायनिक, गणित अथवा संशोधनात्मक अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, चार्टर्ड फायनान्स एनालिसिस्ट, कंपनी सेक्रेटरी, ह्युमन रिसोर्स इत्यादी अभ्यासक्रमांची प्राथमिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, महाराष्ट्रातील ख्यातनाम महाविद्यालयात कमर्शियल आर्ट, फाईन आर्ट इत्यादी विविध ज्ञानशाखात प्रवेश मिळवून पदवी/ पदविका अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. येणाऱ्या अर्जांची छाननी करून निवड झालेल्या विद्यार्थ्यास वार्षिक रुपये दहा हजार या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाईल व त्या विद्यार्थ्याने आपला शैक्षणिक स्तर समाधान कारक राखल्यास त्याला संपूर्ण अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.विद्यार्थ्यांनी निवडलेला अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी,आर्थिक गरज व निकड या सर्व बाबींचा फाऊंडेशनच्या शिक्षणतज्ञ, मार्गदर्शक यांच्या विचार विनिमययाने शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी निश्चित केला जाईल व ती रक्कम विद्यार्थ्यास देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती चा अर्ज www.shrishanaishwarfoundation.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी करून विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल. अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती तसेच आपल्या विभागातील एका समाजबांधवाचे शिफारस पत्र जोडावयाचे आहे. अर्जातील माहिती संदर्भात चौकशी व तपासणी करण्याचा अधिकार संस्थेकडे राहील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२० आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून द्वारा प्रभाकर संतू कोते, विश्वस्त बी २६, श्री सद्गुरू को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, ९० फूट रोड भांडुप गाव, भांडुप (पूर्व)मुंबई- ४०००४२ या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन श्री शनेश्वर फाउंडेशनच्या वतीने चेअरमन डॉ.श्याम शिंदे, व्यवस्थापकीय विश्वस्त शंभू मुरारी तेली यांनी केले आहे.