रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ; 2021 सालचे पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, ता. 09 : Announcement of Awards रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने सन 2021 सालचे विविध पुरस्कार आज जाहीर केले आहेत. गेली अनेक वर्षे अर्ज न मागवता विविध माध्यमातून माहिती मिळवून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारमूर्तींमध्ये अभ्यासू पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, शिक्षक प्रसाद काकिर्डे, उद्योजिक सीमा आठल्ये, कीर्तनकार महेश सरदेसाई, खेळाडू ईशा पवार, उद्योजिका पूर्वा प्रभुदेसाई, वेदमूर्ती नारायण जोगळेकर, डॉक्टर मोहन किरकरे यांचा समावेश आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, पुस्तक भेट आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच कळवण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दिली.
Ratnagiri Karhade Brahmin Sangh has announced various awards for the year 2021 today. For the last several years, these awards have been given through various means of obtaining information without inviting applications. Journalist Rajendra Prasad Masurkar, Teacher Prasad Kakirde, Entrepreneur Seema Athalye & Purva Prabhudesai, Kirtankar Mahesh Sardesai, Archery Player Isha Pawar, Vedmurti Narayan Joglekar, Dr. Mohan Kirkare are among the awardees. Rewards are in the form of cash, souvenirs, book gifts and bouquets. Madhav Hirlekar, president of Ratnagiri Karhade Brahmin Sangh, informed that the date of award distribution will be announced soon.


Announcement of Awards (पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची माहिती)
ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक कोकणी माणूस, मोटार जगतचे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना दर्पण पुरस्कार (Darpan Award) जाहीर झाला. 35 वर्षांहून अधिक काळ विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन करत आहेत. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे मराठी व इंग्रजी चरित्र लिहिले. कीर यांनी लोकमान्य टिळकांवर इंग्रजीत लिहिलेल्या चरित्राचे मराठीत भाषांतर केले. अजून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय त्यांनी बीए व एमएच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता व इतिहास विषय 11 वर्षे शिकवले आहेत. पत्रकारिता, सुरक्षित वाहतूक, मराठा भाषा, मोटारगाडीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर त्यांची सव्वाशेहून अधिक व्याख्याने झाली आहेत.
आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार (Ideal Teacher Award) कोळंब शाळेचे शिक्षक प्रसाद काकिर्डे (ताम्हाणे, राजापूर) यांना जाहीर झाला. 2008 पासून ते ताम्हाणे धनगरवाडी, तुळसवडे, जांभवली आणि आता कोळंब शाळेत शिकवत आहेत. गेले वर्षभर कोरोना योद्धा म्हणून ते सेवा बजावत आहेत. वाडीवस्तीवरील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणत, शिक्षित करण्याचे काम ते करत आहेत.
आदर्श पौरोहित्य (Ideal Pourohitya Award) पुरस्कार रत्नागिरीतील वेदमूर्ती नारायण जोगळेकर यांना जाहीर झाला. गोकर्ण, कर्नाटक, पुणे, रत्नागिरी येथे त्यांनी दशग्रंथांचे शिक्षण पूर्ण केले. वेदमूर्ती घैसास गुरुजी, वेदमूर्ती आठल्ये गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. 1985 पासून ते पौरोहित्य करत असून पुण्यात वेदशास्त्रोत्तेजक सभेतर्फे घेण्यात येणाऱ्या वैदिकीच्या परीक्षा ते उत्तीर्ण आहेत.
नारदीय कीर्तनकार महेश सरदेसाई (मोर्डे, संगमेश्वर) यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार (Kirtankar) देण्यात येणार आहे. गेल्या 27 वर्षांत त्यांनी 2 हजारहून अधिक कीर्तने केली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांत कीर्तने केली आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार दत्तदासबुवा घाग, गंगाधरबुवा व्यास यांची अनेक कीर्तने ऐकून ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. नंतर ह.भ.प. श्रीपादबुवा ढोले यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (Rani Laxmibai Award) सावर्डे येथील आंतरराष्ट्रीय तिरंदाजपटू (आर्चरी) खेळाडू ईशा पवार हिला जाहीर झाला आहे. ईशाने आंतरराष्ट्रीय आर्चरी चँपियनशीपमध्ये (Internation Archery Championship) रौप्य व कास्य पदक पटकावले आहे. तिसऱ्या दक्षिण आशियायी धनुर्विद्या चँपियनशीपमध्ये सुवर्ण व रौप्य पदके पटकावली आहेत. याशिवाय खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सलग तीन वर्षे सुवर्ण पदक आणि एका स्पर्धेत कास्यपदक मिळवले आहे. राष्ट्रीय पातळीवर (National Level) तिने आतापर्यंत 9 पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत.
उद्योजिका पुरस्कार (Entrepreneur Award) लांज्यातील सौ. पूर्वा प्रभुदेसाई यांना जाहीर झाला. घरात खाण्यासाठी आईंनी बनवलेली कढिपत्ता चटणी लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने 2015 पासून संकल्प फूडसची सुरवात केली. नंतर तिळकूट, लसूण चटणी, गोडा मसाला, पारंपरिक पद्धतीने बनवलेली लोणची अशी सुमारे 35 ते 40 उत्पादने बाजारात आणली. रत्नागिरीसह मुंबई, पुण्यात उत्पादने जातात. कोरोना काळात दीड वर्षे समस्या होत्या. परंतु हापूस आंबा मोदक, दिवाळी फराळ, आयुर्वेदिक उटणे यांचा व्यवसाय केला आहे.
उद्योगिनी पुरस्कार (Entrepreneur Award) सौ. सीमा आठल्ये (शिपोशी, लांजा) यांना जाहीर झाला आहे. सुरवातीला लहानसहान खाद्यपदार्थ तयार करून ओळखीच्या लोकांमध्ये विक्री करायच्या. त्यानंतर श्री समर्थ कृपा या नावाने हा व्यवसाय वाढवत नेला. 2014 मध्ये आवळा सरबत बनवण्याकरिता मशिनरी घेतली. त्यानंतर आवळ्यापासून सरबते, मावा, पेठा, सुपारी, लोणचे तसेच आंबा, लिंबू, मिरची लोणचे, सरबते, आमसुले, कोकम, कुळीथ पीठ अशी उत्पादने करत आहेत. ही सर्व उत्पादने रत्नागिरी जिल्ह्यासह पंढरपूर, पुणे, मुंबईत विक्री होतात.
डॉ. मोहन शंकर किरकिरे यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार (Dhanwantari Award) दिला जाणार आहे. नाणार (ता. राजापूर) येथील डॉ. किरकिरे हे 1985 पासून वैद्यकीय सेवा (Medical Service) बजावत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांवर अगदी कमी शुल्कामध्ये उपचार केले आहेत.
पुरस्कारमूर्तींचे अभिनंदन कऱ्हाडे ब्राह्मण संघाने केले असून लवकरच पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करण्यात येणार असून त्यावेळी संघाच्या सदस्य आणि ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.
आजच्या बातम्या
पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार
पहाण्याजोगे :
कोकणची संस्कृती : नरवणचा बगाडा