जलाशयात मातीचा भराव टाकण्याचे काम प्रगतीपथावर; आ. जाधव यांच्या प्रयत्नांना यश
गुहागर : गुहागर – चिपळूण -विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याला पर्यायी तात्पुरता रस्ता १५ दिवसात पूर्ण होईल, असे आश्वासन आमदार भास्करराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शृंगारतळी येथील बैठकीत दिले होते. त्यानुसार जलाशयातून मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.
मोडकाआगर पूल अद्याप पूर्ण झालेला नसल्याने वाहनचालक, प्रवासी, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शृंगारतळीमार्गे पालपेणे, रानवी असा सुमारे २३ किमीचा वळसा मारून गुहागरला जावे लागते. त्यामुळे आर्थिक नुकसानी बरोबरच वेळही वाया जातो. अखेर हा विषय आमदार भास्करराव जाधव यांच्याकडे गेला. त्यांनी पुलाच्या बांधकामाला लागणारा विलंब लक्षात घेऊन तातडीने ठेकेदार, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना घेऊन पुलाचे पाहणी केली. यावेळी त्यांनी पर्याय रस्त्याची कल्पना देऊन काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याच्या जवळून जलाशयात मातीचा भराव टाकून चारचाकी व दुचाकी वाहने जातील असा तात्पुरता रस्ता बनविण्याचा निर्णय घेतला. अखेर या कामाला मूर्त स्वरूप आले आहे.
काही दिवसांपूर्वी हा रस्ता पूर्ण होऊन गुहागरकडे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांचा वळसा वाचणार आहे. दरम्यान, गुहागर विजापूर रस्ता रुंदीकरण सुरुवात झाल्यापासून गुहागर तालुक्यातील रुंदीकरणाबाबतचे अनेक प्रश्न आमदार जाधव यांनी सोडवले आहेत. मोडकाआगर पुलाला पर्यायी रस्ता करण्याची आमदार भास्कर जाधव यांच्या निर्णयाने गुहागर तालुक्यातील नागरिक, वाहन चालक प्रवासी यांनी स्वागत केले आहे.